सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्ती; अन्याया विरोधात लोकसभेत आवाज उठविणार :धैर्यशील माने ; Belguam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhairyasheel Mane

सीमाभागात कन्नडसक्ती; अन्याया विरोधात लोकसभेत आवाज उठविणार

बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई (Chennai)येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव (Belguam) येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी खानापूर (Khanapur) तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane)यांच्याकडे करण्यात आली आहे.

युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे खासदार माने यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील (Dhanjay patil) यांनी बेळगाव येथे भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय अनेक वर्षे बेळगाव येथे होते. त्यामुळे या भागातील लोकांना आपल्या समस्या मांडण्यास मदत होत होती.

मात्र काही महिन्यांपूर्वी हे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना त्रास होणार असून कर्नाटक सरकारने सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्ती वाढविण्यास सुरवात केली आहे. त्याबाबत लोकसभेत आवाज उठवावा तसेच काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यानी आसाम व मिझोराम राज्यातील सीमावादाबाबत चर्चेला उत्तर देताना आसाम व मिझोराम राज्याप्रमाणेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात देखील अनेक वर्षांपासून सीमावाद कायम असल्याची माहिती दिली होती. त्याच प्रकारे येणाऱ्या दिवसात सीमावादाबाबत लोकसभेत चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार माने यांनी सीमाभागात सुरू असलेल्या अन्यायाची कल्पना असून सर्व विषयांवर लोकसभेत आवाज उठविला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सचिव सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, संदीप मिराशी आदी उपस्थित होते.

खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने या मार्गाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करावी अशी मागणीही युवा समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली. यावेळी त्यांनी लवकरच याबाबत गकडरी यांच्याशी चर्चा करतो असे आश्वासन दिले.

loading image
go to top