युवराज कामटेने डोक्‍याला रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची दिली धमकी : अमोल भंडारे याची साक्ष

शैलेश पेटकर
Tuesday, 19 January 2021

"अनिकेत कुठे आहे माहिती नाही, असेच सांगायचे. तसे सांगितले नाही, तर अनिकेतसारखे तुलाही मारून टाकीन,'' अशी धमकी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून दिली होती, अशी साक्ष कोथळे याचा मित्र आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने न्यायालयात नोंदवली.

सांगली ः "मी आणि अनिकेत कोथळे दोघे पळून गेलो होतो. अनिकेत कुठे आहे माहिती नाही, असेच सांगायचे. तसे सांगितले नाही, तर अनिकेतसारखे तुलाही मारून टाकीन,'' अशी धमकी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून दिली होती, अशी महत्त्वपूर्ण साक्ष कोथळे याचा मित्र आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने न्यायालयात नोंदवली.

कोरोनाच्या काळात खंडित झालेली बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. दरम्यान, बचाव पक्षातर्फे उद्या (ता. 19) उलटतपास होणार आहे. 

भंडारे याने 6 नोव्हेंबर 2017 रोजी घडलेला प्रकार न्यायालयाला सांगितला. त्याने न्यायालयासमोर सांगितले की, घटनेदिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास मला व अनिकेतला कामटे याने लूटमारप्रकरणी अटक केली. त्यांनी आम्हाला पोलिस कोठडीत ठेवले होते. रात्री आठच्या सुमारास आम्हा दोघांना लॉकअपमधून बाहेर काढले. त्यावेळी तत्कालीन उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी शहर पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी मला व अनिकेतला कुठे चोरी केली, असे विचारले. त्यानंतर कामटेला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगून त्या निघून गेल्या. 

तो तडफडत होता 
त्यानंतर कामटेने मला व अनिकेतला कोठडीतून बाहेर काढून जवळ असलेल्या खोलीत नेले. त्या ठिकाणी इतर अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले हे होते. कामटेने खोलीचा दरवाजा बंद केला. त्याने आम्हाला रबरी पाईपने पायांच्या तळव्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही गयावया करू लागलो; मात्र कामटे ऐकत नव्हता. त्यानंतर आम्हा दोघांना कपडे काढण्यास सांगितले. विवस्त्र झाल्यानंतर अनिकेतचे हातपाय दोरीने बांधले. लाडने हात बांधले तर इतरांनी पाय बांधले. कामटेने अनिकेतला उलटे टांगायला लावले. अनिकेतला छताला उलटे टांगल्यानंतर बुरखा घातला. अनिकेतला दिसत असल्याने आणखी एक बुरखा घातला. बुरखा घातल्यानंतर पाण्याच्या बादलीत त्याचे तोंड बुडवले. कामटेच्या सांगण्याप्रमाणे टोणे, लाड, पट्टेवाले यांनी दोरी हळूहळू सोडली. अनिकेतचे डोके पाण्यात बुडल्यानंतर तो तडफडत होता. माझा श्‍वास गुदमरतोय, माझा बुरखा काढा, असे तो म्हणत होता. 

अनिकेतची हालचाल थांबली 
दरम्यान, अनिकेतची हालचाल थांबली. त्यानंतर त्याला खाली घेतले. मला त्याच्या पाठीवर बसायला सांगितले. त्यानंतर मुल्ला, शिंगटेने आम्हाला मारहाण केली. अनिकेतचे डोके कामटेने गुडघ्याने दाबत "दाखव तुझा जोर, आता ताकद संपली काय' असे म्हटले. त्यानंतर अनिकेत निपचित पडला. मला अनिकेतच्या तोंडात फुंकर मारायला सांगितली. यावेळी लाड म्हणाला, तो थंड पडलाय. त्यानंतर मला व अनिकेतला खोलीबाहेर काढले. मुल्लाने मला दुचाकीवर बसून विसर्जन घाटावर नेले. त्यानंतर तेथे पोलिस गाडी व एक मोटार तेथे आली. मला मोटारीच्या डिकीत बसायला सांगितले. अनिकेतला मोटारीत पुढे ठेवले होते. ते मला पोलिस व्हॅनमधून काढताना दिसले. मोटारीत लाड, कामटे, टोणे व मी होतो. 

मृतदेह जळाल्याचा वास 
साडेतीन तासांनंतर मोटार थांबवण्यात आली. त्या ठिकाणी मला तेथे जळाल्याचा वास आला. त्यानंतर कामटे, लाड, टोणे हे मोटारीत येऊन बसले. मला टोणेने धमकी दिली, ""हा प्रकार कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाही असेच मारून टाकू.'' कामटेनेही धमकी दिली. माझ्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावले. मी आणि अनिकेत दोघे पळून गेलो होतो, मी निपाणीला गेलो तर अनिकेत कुठे गेला मला माहिती नाही, असे सांग, म्हणून कामटेने धमकी दिली. जर असे सांगितले नाहीस तर तुला गोळ्या घालून ठार करू, असे धमकावल्याचे अमोल भंडारे याने न्यायालयासमोर सांगितले. 

संशयितांना ओळखले 
अमोल भंडारे याने न्यायालयासमोर संशयित युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झाकीर पट्टेवाले यांना ओळखले. या गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू बादली, प्लास्टिक पाइपही त्याने ओळखली.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Kamte threatens to kill : Amol Bhandare told in court