पाटणकरांना संजीवनी; देसाईंसाठी चिंतनाची वेळ

- जालिंदर सत्रे
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कौल; भविष्यातील राजकीय घडामोडींची झलक 
पाटण - विधानसभेतील पराभवानंतर कोमात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांना संजीवनी देणारा व आमदार शंभूराज देसाई यांना आत्मचिंतन करायला लावणारा पंचायत समितीचा निकाल आहे. बदलत्या राजकीय घडामोडीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची झलक दाखविली असून, देसाईंना ब्रेक लावणारा व पाटणकरांना ‘दिल्ली अभी बहुत दूर है’चा प्रत्यय आणणारा हा निकाल आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कौल; भविष्यातील राजकीय घडामोडींची झलक 
पाटण - विधानसभेतील पराभवानंतर कोमात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांना संजीवनी देणारा व आमदार शंभूराज देसाई यांना आत्मचिंतन करायला लावणारा पंचायत समितीचा निकाल आहे. बदलत्या राजकीय घडामोडीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची झलक दाखविली असून, देसाईंना ब्रेक लावणारा व पाटणकरांना ‘दिल्ली अभी बहुत दूर है’चा प्रत्यय आणणारा हा निकाल आहे.
कोयना विभागात देसाई गट- शिवसेना एकत्र असताना व राजाभाऊ शेलार शिरळ गणात अडकून पडले असतानाही राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीने त्यांना धोबी पछाड देताना देसाईंच्या एकसंध रासाटीत दुफळी निर्माण केली.

त्याचबरोबर आम्हीच नंबर वन असल्याचे दाखवून दिले. तारळे विभागात प्रथमच राष्ट्रवादी एकसंध राहिली. त्याचा फायदा पाटणकरांना जसा मिळाला तसा रामभाऊंचा जनतेतील करिष्मा देसाईंना पराभवाचा मार्ग दाखविणारा ठरला.

चाफळचा ढासळलेला बुरुज सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हाणून पाडताना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध केला. देसाईंनी मात्र डी. वाय. पाटील यांना प्रवाहात आणण्यासाठी उशीर केल्याने पराभव स्वीकारावा लागला. राजाभाऊ शेलारांसाठी धनगर समाजाचा रोष शिरळ गणात अंगावर घेताना माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा व माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील यांचा कायमचा दबाव झुगारण्याचे केलेले धाडस पाटणकर पिता-पुत्रांना फायद्याचे ठरले.

शिवसेना जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांचे आव्हान मोडीत काढताना देसाईंनी गटाला जागरूक केल्याने उसाच्या दरापेक्षा देसाई गट महत्त्वाचा हे निकालातून दाखवून दिले. मल्हारपेठ गणात राष्ट्रवादीने कडवे आव्हान दिले. मात्र कार्यकर्ते संभ्रमात राहिल्याने विजय मिळवू शकले नाहीत. कोयना काठावरील मारुल हवेली व मल्हारपेठ हे देसाई गटाचेच बालेकिल्ले आहेत, यावर शिक्कामोर्तब करताना बशीर खोंदूचे सर्वसाधारण जागेवरील आक्रमण नाटोशी गणात विजय मिळवून गेले. 

आमदार नरेंद्र पाटील यांनी दहा वर्षांत दुरावलेले मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुख्य प्रवाहात आणल्याने तिरंगी लढतीत दोन गणांचा हातभार लावला. हिंदुराव पाटील यांची काँग्रेस दुसऱ्या स्थानावर तर देसाईंना तिसरे स्थान स्वीकारावे लागले. काळगाव गटात बाबा व देसाई गट विभागला असतानाही त्याचा फायदा राष्ट्रवादीला उचलता आला नाही. दहा वर्षांत रमेश मोरे, संजय देसाई व संगीता गुरव यांना पदाधिकारी होता आले; पण कार्यकर्ते होता न आल्याने राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली. कुंभारगावात देसाईंबरोबर व ढेबेवाडीत पाटणकरांबरोबर अशी दुहेरी भूमिका काँग्रेसला किंगमेकरच्या भूमिकेतून प्रवाहाबाहेर फेकणारी ठरली. 

पाटणकरमुक्त तालुका व विरोधकांचा आवाज दाबून त्यांचे अस्तित्व मिटविण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न, टोकाची भूमिका घेतल्याने दुरावलेले कार्यकर्ते ही देसाईंच्या पराभवाची कारणे म्हणावी लागतील. दोन वर्षे शांत असणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांनी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी चार्ज करून भविष्याचा विचार करून घेतलेले निर्णय विजयाद्वारे योग्य ठरविले; पण विधानसभेसाठी संपर्क वाढविणे व सक्रियतेत सातत्य राखणे आव्हानात्मक आहे. आमदार देसाईंना मात्र झालेल्या चुका दुरुस्त केल्या नाहीतर काय होऊ शकते याची चुणूक निवडणुकीने दाखविली आहे.

पाच हजारी मनसबदार 
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना आमदार देसाई यांच्या बालेकिल्ल्यात पाच हजारी मनसबदार होण्याचा केलेला प्रयत्न लक्षणीय ठरला. त्यांचा पराभव झाला असला तरी कमी वेळेत केलेले संघटन, दोन्ही गटांना दिलेले छेद व तरुण कार्यकर्त्यांची निर्माण केलेली फळी या बाबी त्यांच्या उमेदवारीतील बाबी दखल घ्यायला लावणाऱ्या ठरल्या आहेत. 

Web Title: zp & panchyat committee future politics