esakal | शेतकऱ्याच्या मुलाची "पेटंटस्‌'मध्ये सुवर्णभरारी; एकाच दिवशी केली 11 संशोधनाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer's son wins gold in "patents"; 11 researches done on the same day

शिराळा तालुक्‍यातील येळापूर येथील शेतकरी कुटुंबातील विशाल बाळासो पाटील यांनी एकाच दिवशी 11 संशोधनाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाची "पेटंटस्‌'मध्ये सुवर्णभरारी; एकाच दिवशी केली 11 संशोधनाची नोंद

sakal_logo
By
बाजीराव घोडे

कोकरुड (जि. सांगली) : शिराळा तालुक्‍यातील येळापूर येथील शेतकरी कुटुंबातील विशाल बाळासो पाटील यांनी एकाच दिवशी 11 संशोधनाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी केलेल्या या पराक्रमाची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली असून, अशा पद्धतीचा विक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरल्याने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविले. 

येळापूरसारख्या ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या विशाल पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येळापूर येथे, तर पदविका शिक्षण "पीव्हीपीआयटी' बुधगाव- सांगली येथे झाले. पदवीचे शिक्षण आयओके कॉलेज ऑफ इंजिनिरिंग (पुणे) मध्ये झाले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षे पुणे येथील संत तुकाराम पॉलिटेक्‍निक येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर मागील 3 वर्षांपासून पुणे येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्‍निकमध्ये प्राध्यापक आणि संशोधन विभागामध्ये समन्वयक म्हणून ते काम पाहत आहेत. 

प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांना 2018 मध्ये एमएसबीटीई-मुंबईकडून उत्कृष्ट प्रोजेक्‍ट मार्गदर्शक म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरव केले. 2020 साली त्यांनी बनवलेल्या इलेक्‍ट्रिक व्हेईकलला "इलेक्‍ट्रिक व्हेईकल चॅम्पियनशिप'मध्ये सर्वात लोकप्रिय वाहन म्हणून प्रथम पारितोषिक देण्यात आले.

प्राध्यापक म्हणून काम करत असताना वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांनी कृषी, यंत्र अभियांत्रिकी, उद्योग, सौर ऊर्जा, जलसंशोधन, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून त्यासाठी एकूण 17 पेटंट्‌स मिळवले आहेत. नोंद केली ही सर्व संशोधने भारतीय पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

यापैकी 11 पेटंट्‌सची एकाच दिवशी भारतीय पेटंट कार्यालयामध्ये नोंद करून त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली. अशा पद्धतीचा विक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. याबद्दल त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌कडून सुवर्णपदकासह पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या त्यांच्या यशामध्ये पिंपरी चिंचवड पॉलिटेक्‍निकच्या प्राचार्या डॉ. व्ही. एस. बायकोड, यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. एस. पी. चाफळकर, प्रा. राहुल शेळके आणि यंत्र अभियांत्रिकीचे सर्व सहकारी यांचे साहाय्य व मार्गदर्शन मिळाले. 

संपादन : युवराज यादव