कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र

सुवर्णा नवले
Wednesday, 28 October 2020

कोविड पश्‍चात उपचारासाठी मानधनावर मनुष्यबळ घेण्यास मान्यता मिळाली आहे. या विभागात पल्मोनॉलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, मनोविकारतज्ज्ञ, भौतिक उपचार शास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञांची गरज आहे.

पिंपरी : कोरोनातून बरे झाल्यावरही बहुतांश लोकांना काही काळासाठी अशक्तपणा, थकवा जाणवतो. उच्च मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांना समुपदेशन गरजेचे असते. कोरोनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना योग्य उपचार (थेरेपी) दिल्यास भविष्यात कोणताही धोका जाणवणार नाही. यासाठी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) कोविड पश्‍चात उपचार (पुनर्वसन) केंद्र उभारण्यासाठी 16 ऑक्‍टोंबरला परवानगी मिळाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी यांनी 'सकाळ'ला सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. वायसीएममध्ये आतापर्यंत 13 हजार रुग्णांवर उपचार झाले. आता दोन हजार 158 रुग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या मनात भीती आहे. सर्दी, ताप झाल्यासही रुग्ण घाबरून जातात. या पार्श्‍वभूमीवर अधिक माहिती घेण्यासाठी डॉ. वाबळे यांच्याशी संवाद साधला.

खासगी बॅंकांचे ढिसाळ नियोजन; पिंपरीतील खातेदारांचे हाल​

वेळेत समुपदेशन मिळाल्यास नागरिकांना फायदा होऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, "कोविड पश्‍चात उपचारासाठी मानधनावर मनुष्यबळ घेण्यास मान्यता मिळाली आहे. या विभागात पल्मोनॉलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, मनोविकारतज्ज्ञ, भौतिक उपचार शास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञांची गरज आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे सेंटर चालविले जाणार आहे. यासाठी चार कंपन्यांना पत्र पाठविले आहे. त्यांनीही मदतीची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या आठवड्यात हे केंद्र शहरवासियांसाठी सुरु झाल्यास फायद्याचे ठरेल. या केंद्रासाठी सुमारे 10 ते 15 लाख खर्च येईल. यामध्ये श्‍वसनाच्या व्यायामासाठी स्पायरोमीटर, कार्डिओथेरपी आणि इतर साधनांची गरज आहे. हे सेंटर वायसीएममध्येच सर्वांसाठी दिवसभर खुले ठेवण्याचा प्रयत्न आहे.''

प्रकृती बिघडल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात दाखल

वायसीएममधील इतर सेवाही पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. काही मजले रिकामे करून 50 टक्के नॉन कोविड ठेवण्याचा प्रयत्न आहे. रिहॅबिलेशन सेंटर या आठवड्यात सुरू होईल. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी देखील हे उपयोगाचे आहे. कोरोना अद्याप आहे, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरम पाणी पिणे, पाण्याची वाफ घेणे, सतत मास्क वापरणे, व्हिटॅमिन्स घेणे गरजेचे आहे. आवश्‍यक भासेल त्यावेळी सलाईन स्प्रेचा वापर करावा.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post covid center to be set up at YCM Hospital Pimpri