मावळात आज ११ नवे पॉझिटिव्ह; तालुक्यात कोरोनाचा धोका वाढतोय              

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मावळ तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) लोणावळा येथील चार, तळेगाव येथील दोन व धामणे येथील पाच अशा अकरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) लोणावळा येथील चार, तळेगाव येथील दोन व धामणे येथील पाच अशा अकरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

धामणे येथील एका कोरोनाबाधित महिलेचा २७ तारखेला मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील तिचा पती, सासू, दीर, जाऊ व आई अशा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डोंगरगाव येथील रहिवासी व लोणावळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याचा अहवाल २८ तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या आजी, आजोबा व वडिलांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी २७ तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील ओळकाईवाडी येथील २७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तळेगाव येथील एका ४० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने २७ तारखेला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २९ तारखेला तिचा स्वॅब घेण्यात आला होता. मंगळवारी तो पॉझिटिव्ह आला. २९ तारखेला पॉझिटिव्ह आलेल्या येथील एका रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या १४ वर्षीय मुलीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मंगळवारी अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या ९८ झाली आहे. त्यात शहरी ३९, तर ग्रामीण ५९ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ३३ जणांची नोंद झाली आहे. तालुक्यात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 new corona positive in maval tuesday