esakal | पिंपरी: अकरावी प्रवेशाची गती मंदावली
sakal

बोलून बातमी शोधा

11 th

पिंपरी: अकरावी प्रवेशाची गती मंदावली

sakal_logo
By
आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: अकरावी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. प्रक्रियेला वीस दिवस झाले आहेत. मात्र पालकांच्या स्थलांतरामुळे तिसऱ्या फेरीनंतरही प्रवेशासाठी महाविद्यालयांना अल्प प्रतिसाद मिळत नाही. परिणामी अनुदानितचे ७० तर विनाअनुदानितचे केवळ ३० टक्केच प्रवेश झाले आहेत. त्यामुळेच आरक्षित जागांवर प्रवेश निश्‍चित करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांकडून आता हमीपत्र लिहून घेवून प्रवेश देण्याची वेळ महाविद्यालयांवर आली आहे.

हेही वाचा: डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींवर 15 सप्टेंबरला आरोप निश्चिती

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. प्रवेशाच्या सुरवातीला आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या १५ टक्के मुलांना शुल्क न भरल्याने टीसी मिळालेले नाहीत.

तर राज्यमंडळाचे ५ टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांना टीसी आणि गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती. आता मात्र, अल्प प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात असल्याचे प्राचार्य विक्रम काळे यांनी सांगितले.

अद्याप दाखले पडून

एवढेच नाही तर शहरात ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला चौकशी केली. त्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी आलेच नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शाळा-महाविद्यालयातून अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्या दाखला (टीसी) नेला नसल्याची वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे प्रवेशासाठी मोठी अडचण होत असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे. प्रवेशाला प्रतिसाद वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी भाग - दोन भरण्यासाठी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे.

अंडरटेकींग लिहून घेण्याची वेळ

अजूनही हवा तसा प्रतिसाद प्रवेशांना मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना अजूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळालेले नाही. अशा इतर मागासवर्गीय (ओबीसी), विशेष मागासवर्गीय (एसबीसी) भटक्या विमुक्त जाती व जमाती ( वीजेएनटी) च्या विद्यार्थ्यांना आरक्षणाधारित प्रवेशासाठी दाखले न मिळाल्याने शेवटी अंडरटेकींग लिहून घेत तात्पूर्ते प्रवेश दिले जात आहे. त्यांच्याकडून किती दिवसात प्रमाणपत्र मिळेल याची हमी लिहून घेत प्रवेश दिला जात आहे.

प्रतिसादाची गती मंदावलेलीच

अकरावी प्रवेशाची गती ही निकालानंतर वेग धरेल असे वाटले होते. परंतू, अजूनही हवा तसा प्रतिसाद नाही. नामांकित महाविद्यालांची प्रवेश प्रक्रिया तीन ते चार दिवसात पूर्ण झाली आहे. परंतू इतर तिथे आज घडीला प्रवेश प्रक्रिया सुरु होवून २० दिवस उलटले आहेत. तरी देखील प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. अनुदानितचे ७० तर विनाअनुदानितचे केवळ ३० टक्केच प्रवेश झाले आहेत, असेही महाविद्यालयांनी सांगितले.

loading image
go to top