यंदाचा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांविनाच

ज्ञानेश्वर वाघमारे
Friday, 14 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे करण्याचे आदेश; साध्या पद्धतीने होणार साजरा 

वडगाव मावळ (पुणे) : रिमझिम पावसातही उत्साहाच्या वातावरणात देशभक्तिपर घोषणा देत निघणारी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, स्काऊट पथकाचा लेझीम पथकासह ऐटीत चालणारा कदमताल व बालगोपाळांचा गलबलाट. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हमखास दिसून येणारे हे चित्र यंदा मात्र दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांविनाच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे यंदा अतिशय साध्या पद्धतीने शनिवारी ध्वजवंदनाचा कार्यक्रम मावळात होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मावळातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिनप्रतिदिन वाढ होत चालली आहे. त्यामुळेच यंदाच्या शैक्षणिक वर्षात अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. सकाळच्या प्रहरी लेझीम पथकासह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी निघते. विविध शासकीय कार्यालयात ध्वजवंदनासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. तालुक्‍याचे ठिकाण असल्याने वडगाव नगरपंचायत, न्यायालय, पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून जाते. ग्रामीण भागातही प्रत्येक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या ध्वजवंदनासाठी त्यांची आवर्जून उपस्थिती असते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा मात्र कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी तो अतिशय साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांविना साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत महापालिका व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर पत्रे पाठवली आहेत. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना ध्वजवंदनाचा कार्यक्रम करण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे. शाळा स्तरावर सकाळी साडे आठपूर्वी तो घ्यावा. शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह कमाल पाच व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित असतील. सोशल डिस्टन्सिंग व सर्वांसाठी मास्क अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या शाळेत कार्यक्रम घेऊ नये. कार्यक्रमास गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींनाही मोजक्‍या लोकांमध्ये व कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन ध्वजवंदनाच्या सूचना दिल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यांनी दिली. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये गावातील स्वातंत्र्यसैनिक (तब्येत उत्तम असलेले), तंटामुक्त समिती अध्यक्ष अथवा ग्रामसेवकाच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. ध्वजवंदनाव्यतिरिक्त ग्रामसभा अथवा कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याची माहिती वाजे यांनी दिली. 

ग्रामसभा रद्द 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2020-21 चे लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याची सूचना ग्रामपंचायतींना यापूर्वी करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे. ग्रामसभेऐवजी सदस्यांचे लेखी म्हणणे घेऊन ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 august 2020 independence day without students maval news