esakal | रेमडेसिव्हीरची २१ इंजेक्शन जप्त; केमिस्टसह तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

रेमडेसिव्हीरची २१ इंजेक्शन जप्त; केमिस्टसह तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) काळा बाजार (Black Market) करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून तब्ब्ल २१ इंजेक्शन जप्त केली आहेत. ही कारवाई (Crime) काळेवाडी येथे करण्यात आली. (21 injections of remdesivir seized Three arrested including chemist)

थेरगावातील क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफमध्ये कामाला असलेला कृष्णा रामराव पाटील (वय २२), चिंचवडमधील ओनेक्स हॉस्पिटलमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून कामाला असलेला निखिल केशव नेहरकर (वय १९, रा. बिजलीनगर, चिंचवड) तसेच चिंचवडमधील आयुश्री मेडिकलचा चालक केमिस्ट शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय ३४, रा. दत्त कॉलनी, थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ९ मे रोजी (रविवार) रात्री काळेवाडी फाटा येथे वाकड पोलिसांनी अचानक नाकाबंदी केली होती. यादरम्यान, मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास आरोपी कृष्णा व निखिल यांना थांबवून यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीरची इंजेक्शन आढळून आली. त्यांच्याकडे इंजेक्शनच्या विक्री परवानाबाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे जादा दराने इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: कात्रज-कोंढव्यात नियम मोडणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल

त्यानुसार पोलिसांनी पांचाळ याला ताब्यात घेऊन त्याच्या मोटारीची तपासणी केली असता सीटखाली तबला १९ इंजेक्शन सापडली. या इंजेक्शनच्या वितरणाबाबतची माहिती घेतली असता गोदावरी मेडिकल स्टोअर्स (इनहाऊस क्रिस्टल हॉस्पिटल) व आयुश्री मेडिकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) या हॉस्पिटलच्या नावे वितरित करण्यात आले होते. तरीही हे इंजेक्शन पांचाळ यांच्याकडे मिळून आले. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी दहा लाख ३६० रुपये किंमतीची २१ रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त केली. अटक आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

संबंधित हॉस्पिटलच्या नावे वितरित झालेली इंजेक्शन बाहेर कशी आली, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जाणार आहे. संबंधित हॉस्पिटलच्या स्टाफ़चीही चौकशी करणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता

रामडेसिव्हीर इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याबाबत पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांत झालेल्या कारवायांमध्ये हॉस्पिटलमधील कर्मचारी सहभागी असल्याचे दिसून आले आहे. परिचारकासह इतर कर्मचाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. मात्र, यामध्ये तेथील डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपींना हे इंजेक्शन कसे उपलब्ध झाले, कोणाच्या सांगण्यावरून विक्रीसाठी बाहेर आणले याचाही सखोल तपास करणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

इंजेक्शनचे व्हिडिओ शूटिंग

सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची प्रकरणे समोर येत आहे. याला आला घालण्यासाठी हॉस्पिटलला इंजेक्शनचा साठा वितरित होताना व ते इंजेक्शन रुग्णाला वापरत असतानाचे व्हिडिओ शूटिंग करणे आवश्यक आहे. याबाबत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्र देणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

loading image