
संतापजनक! अल्पवयीन मुलाचा २३ वर्षीय तरुणीवर दोन दिवस बलात्कार
पुणे : शेजारी राहणाऱ्या किशोरवयीन मुलानं २३ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimapri Chinchwad Crime) ही घटना घडली असून पोलिसांनी १४ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज त्याला बालन्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
तरुणी तिची आई आणि मावशीसोबत राहते. दोघीही दिवस कामावर जातात. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारचा किशोरवयीन मुलगा घरात घुसला. त्याने १६ आणि १८ अशा दोन्ही दिवशी या तरुणीवर बलात्कार केला. तिची मावशी बुधवारी दुपारी घरी परतली असता तरुणी अस्वस्थ आणि हादरलेली दिसली. खोलीचा पडदा देखील व्यवस्थित लावल्याचे मावशीला आढळले. तरुणी दिव्यांग असल्यामुळे ती हे काम करू शकत नाही. त्यामुळे मावशी आणि आईने आजूबाजूला चौकशी केली. शेजारच्या किशोरवयीन मुलाने तरुणीवर बलात्कार केल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर आई आणि मावशी दोघींनीही पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
पोलिसांनी चौकशी केली असता, १६ आणि १८ मे रोजी तरुणीचे कुटुंबीय घरी नसताना तिच्यावर दोनवेळा बलात्कार केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर मुलाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी बालन्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.