४९ टक्के विद्यार्थी ‘आधार’विना; आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येवरच शिक्षकांची पदे निश्‍चित करणार

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 17 December 2020

सर्व माध्यमिक आणि व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय जून 2013 मध्ये शासनाने घेतला. "सरल'माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होती. 

पिंपरी - शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्डच्या कक्षेत आणण्याची घोषणा करून आठ वर्ष उलटली. मात्र, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही 49 टक्के विद्यार्थी "आधार' कक्षेत नाहीत. "सरल'च्या माध्यमातून शाळांची माहिती एकाच छताखाली आणत, अनेक प्रकारांना गैरप्रकारांना आळा बसेल असा दावा करण्यात आला होता. परंतु हे काम काही महिन्यांपासून पुरते रखडले आहे. दरम्यान आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येवरच शिक्षकांची पदे निश्‍चित करण्यात येणार आहेत. 

सर्व माध्यमिक आणि व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय जून 2013 मध्ये शासनाने घेतला. "सरल'माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होती. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारित प्राथमिक व माध्यमिक 624 शाळा आहेत. यामध्ये तीन लाख 19 हजार 624 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक लाख 63 हजार 558 विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले आहेत. 49 टक्के विद्यार्थ्यांना आधारकार्ड अद्याप मिळालेले नाही. अर्धवट राहिलेल्या कामाकडे लक्ष देण्यास शिक्षण विभागाला वेळ नाही. यासह नियमित आढावाही कागदावरच राहिला आहे. त्यामुळे एक लाख 56 हजार 66 हजार विद्यार्थ्यांनी अद्याप उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांना आधारकार्ड केव्हा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शैक्षणिक वर्षातही येणार अडचणी 
कोरोनामुळे क्षेत्रीय कार्यालयातील मशिन बंद असल्याने अनेक पालकांनी आधार कार्ड काढलेले नाहीत. दुसरीकडे बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड "सरल'मध्ये अपलोड न केल्यामुळे आणखी भर पडली आहे. या शैक्षणिक वर्षातीलच संपूर्ण विद्यार्थ्यांनाच आधारकार्ड अद्याप मिळालेले नाहीत. नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्यांदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. 

दोन महिन्यातही नोंदणीत वाढ नाही 
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 29 सप्टेंबर 2020 ला सर्वच शाळांमधील सगळ्या विद्यार्थ्यांना "आधार' नोंदणी करण्याचा सूचना दिल्या आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही आधार नोंदणीमध्ये वाढ होत नसल्याचे दिसून आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तरच शिक्षकांची पदे निश्‍चित 
शाळांनी टप्प्याटप्प्याने आधार नोंदणी कार्यक्रम राबवून "सरल' प्रणालीमध्ये मार्च 2021 अखेरपर्यंत 100 टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होईल, असे पहावे. जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकाची पदे निश्‍चित करताना फक्त आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. याबाबत विशेष मोहीम राबवून प्रक्रिया पार पाडण्यात यावी. तसेच दर महिन्याचा अखेरीस आढावा घेऊन तो शासनास सादर करण्याच्या सूचना उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

""मशिन मिळाल्यावर उर्वरित विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळेल.'' 
- रजिया खान, पर्यवेक्षिका, महापालिका 

""शहरातील बहुतांश शाळांनी आधार कार्ड अपलोड केलेले नाहीत. कोरोनामुळे क्षेत्रीय कार्यालयातील आधार काढण्याचे मशिन बंद आहेत. '' 
-अनिता जोशी, पर्यवेक्षिका 

शाळा / विद्यार्थी संख्या/ आधार कार्ड काढलेले/ न काढलेले 
-624 / 3 लाख 19 हजार 624/ एक लाख 63 हजार 558 / एक लाख 56 हजार 66 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 49 percent students without Aadhaar card