esakal | ‘स्वाध्याय’मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ५० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Swadhyay

‘स्वाध्याय’मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ५० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शालेय शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘स्वाध्याय’ (Swadhyay) उपक्रमात शहरातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थी (Student) सहभागी झाले आहेत. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा साप्ताहिक सराव आणि गृहशिक्षण होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद ठेवून विद्यार्थ्यांचे आकलन तपासण्यात येत आहे. (50000 Students From Pimpri Chinchwad Participate in Swadhyay)

कोरोनामुळे शाळा नियमितपणे सुरू नाहीत. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र सरकार व राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) ‘स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) तीन नोव्हेंबर २०२० पासून हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्याय दिला जातो.

हेही वाचा: पिंपरी : ७ वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमास साडेतीन वर्षांनी अटक

या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजूषा घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांची साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर आहे. दर शनिवारी गणितातील दहा आणि भाषेतील दहा प्रश्‍न सरावासाठी पाठवले जातात. उत्तरे पाठविल्यावर त्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी समजते. विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून शिक्षकांना चांगल्या पद्धतीने उपाययोजना करणे शक्य होत आहे.

उपक्रम २८ आठवडे सुरू

आतापर्यंत शहरातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गेले २८ आठवडे हा उपक्रम सुरू आहे. सरकारच्या ‘शाळा बंद पण शिक्षण आहे’ उपक्रमांतर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्हींचा समावेश आहे. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र, सुरू आहे. भविष्यात स्वाध्याय ‘युडायस’ कोडशी जोडला जाणार आहे. त्यानुसार शिक्षक स्वतःच्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थी यांची कामगिरी बघू शकतील आणि विद्यार्थ्यांना मदत करू शकतील. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले आहेत. लवकरच इतर माध्यमांचेही विषय सुरू करण्यात येणार आहेत.

loading image