पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय कचरा वाढतोय; सहा महिन्यांत कोविडचा 'एवढा' कचरा जमा

सुवर्णा नवले
Thursday, 3 September 2020

  • जैव वैद्यकीय घनकचराही वाढतोय 
  • कोविड रुग्णांमधील वाढीचा परिणाम
  • सहा महिन्यांत साठ टन जमा 

पिंपरी : कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कचराही तेवढ्याच प्रमाणात जमा होत आहे. हा कचरा नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. सध्या वायसीएम रुग्णालयासह कोविड सेंटर, खासगी रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब, गृहनिर्माण संस्था, सॅम्पल कलेक्‍शन, व शहरातील लॅबमधून कोविड जैव वैद्यकीय घनकचरा (बायोमेडीकल वेस्ट) सहा महिन्यांत साठ टन इतका जमा झाला आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रति किलोप्रमाणे शंभर रुपये खर्च येत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पॉस्को कंपनीला काम दिले आहे. दररोज कचऱ्याचे तीन प्रकारांत वर्गीकरण करून वाहतुकीसाठी प्रति ठिकाण 15 हजार रुपये इतका खर्च येत आहे. 

गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. संसर्ग आटोक्‍यात येण्यासाठी कचऱ्याची देखील योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. सध्या पीपीई कीट परिधान करून कर्मचारी कचरा उचलत आहेत. सर्व वाहनांना जीपीएस ट्रॅकर बसवलेले आहेत. त्यानंतर पिशव्यांमध्ये योग्य तापमानाला जमा केलेला कचरा भट्टीमध्ये टाकून विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी वायसीएम रुग्णालय, तळेगाव दाभाडे, लोणावळा व ग्रामीण भागात दोन ठिकाणी कचरा विल्हेवाट केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मोशी येथील 81 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रदूषण मंडळाकडून ना हरकत दाखला मिळाला आहे. या साठी केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर लवकरच प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाल, पिवळ्या व पांढऱ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये बायो मेडिकल वेस्ट जमा करण्याचे वर्गीकरण केले आहे. बेड व कॉटन वेस्ट, पीपीई कीट हे पिवळ्या पिशवीत, सलाईन व आयव्ही बॉटल, सिरींज लाल पिशवीत, व मेडिसीन पांढऱ्या पिशवीत जमा केल्या जात आहेत. कचऱ्याची इन्सरेटर व ऍटोक्‍लेव्ह मशिनच्या साह्याने विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी चार वाहने आहेत. सध्या नॉन कोविड कचरा सहा महिन्यांचा दोनशे टन इतका जमा झालेला आहे. 
 
जमा झालेला कोविड कचरा (किलोमध्ये) 

  • मार्च : 580 
  • एप्रिल : 2072 
  • मे : 4049 
  • जून : 6827 
  • जुलै : 20742 
  • एकूण : 68843 

कोरोनापूर्वी कोविड वगळून 1700 ते 1800 टन कचरा जमा होत असे आता दिवसाकाठी कोविड व नॉन कोविड मिळून 2700 ते 2800 टन कचरा जमा होत आहे. वाहने सॅनिटाइज करून योग्य ती दक्षता घेतली जात आहे. कोविड कचऱ्याचा दररोजचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला जातो. 
- किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रक मंडळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 tons of covid waste collected in six months at pimpri chinchwad