'या' चोरट्याने असे एटीएम फोडले अन् इथे फेकले; मात्र, शेवटी...

टीम ई-सकाळ
Thursday, 18 June 2020

- मशीन सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस पोहचले एटीएम चोरट्यापर्यंत

पिंपरी : एटीएम मशीन चक्क रस्सीला बांधून ओढत नेत टेम्पोत टाकले. चोरलेले मशीन हॅन्ड ग्रॅण्डर, छन्नी, हातोडीने फोडून त्यातील रक्कम तिघांनी वाटून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी हे मशीन नदीत फेकून दिले. दरम्यान, रस्त्यालगतच्या तब्बल नव्वद सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर अखेर पोलिस एटीएम मशीन चोरट्यांपर्यंत पोहचले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तीन जणांना जेरबंद केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

अजयसिंग अर्जुनसिंग  दुधानी (वय 20, रा. 72 वस्ती, मांजरी बुद्रुक, हडपसर) , शेऱ्या उर्फ श्रीकांत  विनोद धोत्रे (वय 23, वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) या दोघांना अटक केली त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. चिंचवडमधील थरमॅक्स चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन 9 जूनला पहाटे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. पाच चोरटे चक्क मशीनला रस्सी बांधून मशीन ओढत आणून टेम्पोत टाकून पसार झाले होते. यामध्ये माशीनसह पाच लाख 79 हजारांचा ऐवज चोरीला गेला. या घटनेचा तपास सुरू असताना यामध्ये छोटा टेम्पो वापरला असल्याचे समोर आले. अशाप्रकारचा टेम्पो ठाणे व लोणी काळभोर येथून चोरीला गेल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर येथील टेम्पो व गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोची माहिती जुळली. त्यानंतर हा टेम्पो हडपसर, मांजरी भागात असल्याची माहिती मिळाली. या परिसरातील तब्बल नव्वदपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मांजरी येथे टेम्पो घेऊन गेलेले आरोपी त्याठिकाणी टेम्पो सोडून एका मोपेडमध्ये सासवडच्या दिशेने निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. दरम्यान, टेम्पो चोरताना व सोडताना वापरलेली मोटारसायकल व मोपेडवरून येणाऱ्या तरुणांचे फुटेज प्राप्त केले. त्यानंतर हे आरोपी हडपसरमधील महात्मा फुलेनगर येथील असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. युनिट एकच्या पथकाने सापळा रचून तातडीने तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून एटीएममधील दीड लाखांची रोकड, एटीएम मशीन, गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, लोखंडी वायर, दुचाकी असा एकूण सात लाख 49 हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हॅन्ड ग्रेनेड, हातोडीने एटीएम फोडले

आरोपींनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होळकरवाडी येथून छोटा टेम्पो चोरला. या टेम्पोत मशीन टाकून टेम्पो मांजरी भागातील मुळामुठा नदीकिनारी नेला. तेथे मशीन हॅन्ड ग्रॅण्डर, हातोडी व छन्नीने एटीएम मशीन फोडले. त्यातील रक्कम तिघांनी वाटून घेतल्यानंतर ते मशीन नदीच्या मद्यभागी फेकून दिले. त्यानंतर चोरलेला टेम्पो सासवड येथील वडकीफाटा येथे रस्त्याच्या कडेला सोडून दिला. दरम्यान, पोलिसांनी नदीपात्रात  लोहचुंबकाच्या सहाय्याने शोध घेऊन मशीनचा शोध घेतला. 

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सासवड, लोणी काळभोर, हडपसर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accuse arrested by atm machine theft case thermax chowk chinchwad