पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई

भाऊ म्हसळकर
Tuesday, 5 January 2021

महामंडळाच्यावतीने गेली अनेक वर्षे वळवण ते खंडाळा दरम्यानची अतिक्रमणे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमनांना नोटीसा बजावण्यात येत होत्या, मात्र कारवाई होत नव्हती.

लोणावळा : राज्य रस्ते विकास महामंडळ व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. महामंडळाच्यावतीने गेली अनेक वर्षे वळवण ते खंडाळा दरम्यानची अतिक्रमणे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमनांना नोटीसा बजावण्यात येत होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. अतिक्रमण विरोधी कारवाईचा धसका घेत महामंडळाचे अधिकारी, नगरपरिषद व लोकप्रतिनिधी यांच्यात बैठकाही पार पडल्या. मात्र अचानक अतिक्रमण विरोधी कारवाईस वेग येत महामार्गालगत असलेली अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तीन दिवसांपूर्वी करण्यात आले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

दरम्यान मंगळवारी सकाळीच वळवण येथून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, मुख्याधिकारी रवी पवार, कर्नल डेव्हिड जोशुआ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी मोहिमेस सुरवात झाली. नगरपरिषद, आयआरबीचे कंपनीचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह मोठा पोलीस फौज फाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. वळवण ते खंडाळा दरम्यान विशेषतः गवळी वाडा येथे महामार्गालगत पक्क्या बांधकामांच्या समोरील अतिक्रमण करून बांधलेले शेड, फलक रस्त्यावरील अतिक्रमणे, टपऱ्या, बेवारस मोटारी, हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत त्या हटविण्यात आली. कारवाईस सुरूवात झाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून दुकानांचे शेड व फलक काढून घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रस्त्यासाठी किती आणि कधी भूसंपादन झाले, त्याचा किती मोबदला दिला याची आम्ही रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली आहे. महामंडळाने समान कारवाई करावी, आमच्या शंकांचे निरसन करावे, आम्ही आमची बांधकामे स्वतःहून काढून घेऊ. 
-  सुधीर शिर्के, उपनगराध्यक्ष लोणावळा

राष्ट्रीय महामार्गालगत रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे काही आक्षेप, प्रश्न आहेत. त्यांचे निवारण करून रस्ता रुंदीकरणाची कारवाई पुन्हा करण्यात येणार आहे.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action has been taken on encroachments along pune mumbai national highway