esakal | अभिनेत्री सोनालीचे वडील चोरट्याच्या हल्ल्यात जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni

अभिनेत्री सोनालीचे वडील चोरट्याच्या हल्ल्यात जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - इमारतीत शिरलेल्या चोरट्याने (Theft) केलेल्या चाकू हल्ल्यात (Attack) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील (Father) जखमी (Injured) झाले. ही घटना मंगळवारी (ता. २५) सकाळी सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली. (Actress Sonalee Kulkarnis Father Injured in Theft Attack Crime)

याप्रकरणी अजय विष्णू शेक्टे (वय २४, रा. पाचरगी, ता. पाटोदा, जि. बीड) या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री सोनालीचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी (वय ६३, रा. वरलक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: ट्रक मोटारीच्या धडकेत डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कुलकर्णी राहतात. आज सकाळी सातच्या सुमारास ते घरात असताना आरोपी अजय हा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आला. येथे त्याची एका रहिवाशासोबत झटापट झाली. त्यांच्या आरडाओरड्याने कुलकर्णी खाली धावत आले. या वेळी चोरट्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तरीही त्यांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर चोरटा तिसऱ्या मजल्यावर आला आणि त्याने सोनालीच्या आईला, ‘गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारेल,’ अशी धमकी दिली. दरम्यान, आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी कुलकर्णी यांच्या घराकडे धाव घेतली. या वेळी चोरट्याने पळून जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, तो हॉटेलच्या पत्र्यावर पडला. त्यात त्याच्या पायाला जखम झाली. नागरिकांनी त्याला चोप दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नायलॉन दोरी, चाकू, स्प्रे जप्त केले.