मावळात 'या' कनेक्शनमुळे वाढला कोरोना; आता प्रशासनाने उचललंय हे पाऊल

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

मावळ तालुक्यात बघता-बघता कोरोना रुग्णांची संख्या ७७ वर पोचली आहे. त्यात शहरी २९ व ग्रामीण भागातील ४८ रुग्णांचा समावेश आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लोणावळा येथेही कोविड केअर सेंटर सुरु करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मावळ तालुक्यात बघता-बघता कोरोना रुग्णांची संख्या ७७ वर पोचली आहे. त्यात शहरी २९ व ग्रामीण भागातील ४८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तालुक्यात सुरुवातीच्या काळात घरोघरी सर्वे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम, नाकाबंदी, गावबंदी, बिनकामाचे फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई, स्वयंस्फूर्तीने स्थानिक पातळीवरील लॉकडाउन, ध्वनिक्षेपकाद्वारे गावोगावी जनजागृती आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. शासनाने स्थलांतराला परवानगी दिल्यानंतर व लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. विशेषतः मुंबई कनेक्शनमुळे तो वाढत गेला व कोरोना रुग्णांचा आकडा ७७ वर पोचला. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.            

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

प्रशासकीय यंत्रणा सतर्क       

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शनिवारी तळेगाव येथे आढावा बैठक घेऊन उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तालुका आरोग्यधिकारी डॉ. लोहारे यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची नव्याने सुरवात करावी लागणार आहे. सध्या लोकांमध्ये असे शिथिल वातावरण दिसून येत आहे की, जणू काही कोरोनाचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे पंचायत समिती,  लोणावळा व तळेगाव नगरपरिषदा, वडगाव नगरपंचायत व ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक केली जाणार आहे. नियमांची कडक अंमल बजावणी केली जाणार आहे. त्यासाठी भरारी पथके नेमली जाणार आहेत.        

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा                                   
 लोणावळा येथे सीसीसी सेंटर     

सध्या तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्रात स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्याची व सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था आहे. तर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था आहे. दोन्ही मिळून २८६ बेड्सची व्यवस्था आहे. आगामी काळात लोणावळा येथेही कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टनसिंग कटाक्षाने पाळावे असे आवाहन डॉ. लोहारे यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administrative system alerted in maval due to corona