esakal | सकाळ 'इम्पॅक्ट'! आळंदीत लसीकरणातील वशिलेबाजीला बसणार आळा
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccine

सकाळ 'इम्पॅक्ट'! आळंदीत लसीकरणातील वशिलेबाजीला बसणार आळा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आळंदी (Alandi)- कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी तासनतास रांगेतील नागरिकांना डावलून ग्रामिण रूग्णालय आणि पालिकेमार्फत सुरू असलेल्या लसीकरण सेंटरवरील कर्मचा-यांकडून वशिलेबाजीने प्राधान्य दिले जात होते. या लसीकरणासाठीच्या (corona vaccination) वशिलेबाजीबाबत चौकशी करून खुलासा पाठविण्याचे आदेश महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिला आहे. त्यांनी असे आदेश आळंदी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षकांना दिले आहे. (Alandi corona vaccination Problem solved)

आळंदीत मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाच्या पाठीमागील बंद शाळेच्या इमारतीत पालिका आणि ग्रामीण रूग्णालयामार्फत लसीकरण केले जात होते. लसीकरणाबाबत नियोजनाचा अभाव प्रत्येक वेळी नागरिकांना आला. जेष्ठ नागरिकांना तिष्ठत बसावे लागत होते. याचबरोबर गर्दीचे नियोजनही केले जात नव्हते. त्यातच येथील कंत्राटी कामगारांची अरेरावी नागरिकांना ऐकून घ्यावी लागत. कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी रांगेतील उभ्या नागरिकांना डावलून वैद्यकिय कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलिसांच्या नातेवाईकांचीच घुसखोरी होती.

हेही वाचा: लसीकरण केंद्रच बनले ‘कोरोना हॉटस्पॉट’! सुपर स्प्रेडर ठरण्याची भिती

तासनतास रांगेतील नागरिकांना साधे बसायला जागा नाही, प्यायचे पाणी नाही आणि त्यातच वशीलेबाजीने आळंदीकर हैराण झाले. याबाबतचे वृत्त दैनिक सकाळमधे छापून आले. तसेच 'ईसकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा परिणाम की, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा रूग्णालय पुणे यांच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आळंदी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणपत जाधव यांना खुलाचा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडे दिली आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबाबत आता पुढील कारवाई काय होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.