Anna-Bansode with Ajit Pawar
Anna-Bansode with Ajit Pawar

चाणक्‍यनीती जाणणारा नेता

पिंपरी-चिंचवड शहराबद्दल दादांना कमालीची आत्मियता आहे. शहराच्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात. दादा बारामतीचे. पण बारामती आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे वेगळे न मानता ते बारामती समजूनच पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी झटतात. पाण्याचा प्रश्‍न असो किंवा झोपडपट्टी विकासाचा. झोकून देऊन काम करणारा हा नेता म्हणून दादांची ओळख आहे. विधिमंडळात २००९ ते २०१४ दरम्यान आमदार असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अधिकाऱ्यांबरोबर त्यांची काम करण्याची पद्धत, प्रशासनावरील पकड, स्पष्टवक्तेपणा, काम करून घेण्याची हातोटी मी जवळून अनुभवली आहे. महाराष्ट्राला दादांच्या रूपाने अतिशय कर्तबगार, हुशार आणि चाणक्‍यनीती जाणणारा असा नेता लाभलेला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं तर माझे मूळ गाव सोलापूर. वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही सोलापूरहून येथे आलो. मी पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 50 वर्षांपासून वास्तव्यास आहे. तेव्हापासून या शहराचा विकास पाहतो आहे. ज्या महान नेत्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड शहराचा विकासात जडणघडणीत खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाची भूमिका ठरली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आदरणीय शरद पवारसाहेब त्यानंतर अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना मला आलेले अनेक अनुभव सांगण्यासारखे आहेत. 

पानविक्रेत्याला संधी 
अतिशय गरीब कुटुंबात राहत असताना मी घरच्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी चिंचवड स्टेशन परिसरात पानाची टपरी चालवत होतो. तेथे येणारे राजकीय कार्यकर्ते, नेतेमंडळींची चर्चा माझ्या कानावर पडत असे. त्यावेळी अनेक जण मित्र झाले. त्यामुळे मलाही राजकारणाची गोडी लागली. महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता होती. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नेतृत्व होते. लोकसभेच्या 1991 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजितदादा खासदार झाल्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. या सर्व राजकीय घडामोडी मी पाहात होतो. त्यावेळी आपणही कधीतरी नगरसेवक व आमदार होऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु, अजितदादांसारख्या दूरदर्शी नेत्याने माझ्यासारख्या पान विक्रेत्याला संधी देऊन मोठे केले. 

विकासासाठी महत्त्वाचे निर्णय 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 1997 च्या निवडणुकीच्या वेळी दादांचा आणि माझा राजकीयदृष्ट्या संबंध आला. दादांची गेली 25-30 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहत असताना त्यांच्या कार्याबद्दल सांगेल तेवढे थोडेच आहे. अतिशय स्पष्ट, कडक आणि प्रशासनावर दबदबा असणारे दादांचे व्यक्तिमत्त्व आहे. गेली 15-20 वर्षांपासून त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर ते किती जबाबदारीने कामे करतात, याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पिंपरी-चिंचवड शहर किंवा राज्यासाठी कोणती योजना, विकास प्रकल्प उपयुक्त ठरेल. तो कशा पद्धतीने राबविल्यास नागरिकांना फायदेशीर ठरेल, याचा सखोल विचार ते करीत होते. शेतकरी असेल वा कामगार. मध्यमवर्गीय नागरिक वा झोपडपट्टीतील रहिवासी, या सर्वांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील, असे सर्वोत्तम निर्णय दादांनी घेतले. 

गेली पंचवीस ते तीस वर्षे शहरात वास्तव्य करीत असताना एखाद्या राजकीय नेत्याच्या चौफेर बुद्धीची जाणीव त्यांनी केलेल्या विकासातूनच दिसून येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवड शहर आहे. अजितदादांनी केलेल्या विकासातून पिंपरी-चिंचवडचे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात पोचले आहे. त्यांच्या कामामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेला बेस्ट सिटीचे ऍवॉर्ड मिळाले आहे. शहरात उद्याने आहेत, स्वीमिंग टॅंक आहेत, सुसज्ज रस्ते व पूल आहेत.

महापालिकेची प्रत्येक कार्यालये अतिशय सुनियोजित आलिशान अशी आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांना सहज-सुलभतेने काम करता यावे, नागरिकांच्या दृष्टीनेही सोयीचे व्हावे, अशा पद्धतीची रचना या कार्यालयांमध्ये केल्याचे दिसते. हे सर्व अजितदादांच्या नेतृत्त्वगुणामुळे घडले आहे. बदलत्या काळाला अनुसरून महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजातही त्यांनी बदल घडवला आहे. त्यामुळेच आज बहुतांश सर्व विभाग संगणकीकृत असलेली अशी ही महापालिका उच्च स्थानावर पोचली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराबद्दल दादांना खूपच आस्था आहे. हे शहर माझे आहे, असे ते मानतात. त्यादृष्टीने माझ्या शहरासाठी केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आणता येतील, त्यासाठी मनापासून आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या एकंदर वागण्या-बोलण्यात आम्हाला वेगळे जाणवले नाही. पाण्याचा प्रश्‍न असेल किंवा झोपडपट्टी विकासाचा या शहराच्या विकासासाठी दादा झोकून देऊन काम करणार. 

स्थायी समिती अध्यक्षपद मिळणे याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच असा निर्णय घेऊ शकतात. मी साधा पानविक्रेता म्हणून पहिल्यांदा पालिकेवर निवडून आलो होतो. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा नगरसेवक असताना पिंपरी-चिंचवड शहराची एवढी मोठी जबाबदारी दादांनी माझ्यावर सोपविली होती. ही सगळी कृपा शरद पवारसाहेब आणि दादांची आहे. त्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविली. ती जबाबदारी मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून यशस्वीपणे पार पाडली. दादांनी मला अध्यक्ष केल्यानंतर शहर विकासाच्या दृष्टीने उड्डाण पुलांची कामे, वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन, मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन असे अनेक मोठे निर्णय दादांच्या मार्गदर्शनाखाली घेतले होते. 

नेता या नात्याने त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. जो कार्यकर्ता ग्रासरुटला काम करतो, त्या कार्यकर्त्याला नक्कीच येथे संधी मिळते, हा माझा अनुभव आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. मी 2007 पासून पिंपरी विधानसभा मतदारसंघात काम सुरू केले होते. 2009 मध्ये तेथील माझे काम बघून आमदारकीची उमेदवारी दिली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतील माझा अनुभव सांगण्यासारखा आहे. या निवडणुकीत ऐनवेळी मला उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी दादांनी मला बोलावून घेतले. तू काम केले आहेस. ही उमेदवारी मी तुला माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर देतोय. कोणत्याही परिस्थिती ही सीट तू निवडून आणली पाहिजेस, असे बजावले. मला स्वतःला अभिमान वाटतो की, दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी पात्र ठरलो.

पिंपरीतून सुमारे 20 हजार मतांच्या फरकाने विजयी झालो. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. त्यात दादांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

त्यावेळी संपूर्ण राज्यातून मी एकटाच दादांबरोबर एकनिष्ठ राहिलो. निवडणुकीत दादांनी मला उमेदवारी देऊन केलेले ऋण चुकते करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे. त्यांनी घेतलेल्या त्या निर्णयाच्या काळात माझ्यावर आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. 

मी स्थायी समिती अध्यक्ष असताना शंभर एमएलडी वाढीव पाण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होता. त्यासाठी तत्कालीन महापौर लक्ष्मण जगताप आणि मी दीड वर्ष प्रयत्न करीत होतो. दादांनी मला बोलावले आणि संबंधित अधिकारी शुक्‍ला यांना बोलावून रात्री साडेआठ वाजता वाढीव पाण्याचा निर्णय मार्गी लावला. अजितदादा वेळेला खूप महत्त्व देतात. वेळ वाया जाऊ न देण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करतात. सकाळी सात वाजता ते कामासाठी तयार असतात. दररोज चौदा तास काम करणारा असा हा नेता आहे.

उपमुख्यमंत्री असताना आजही कार्यकर्ते गेल्यास ते भेट देतात. फोन घेतात, चर्चा करतात. आदरणीच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त मी आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो. त्यांचे स्वप्न, मनोकामना पूर्ण होवो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com