
ज्याप्रमाणे मूल दत्तक घेण्यासाठी विविध अटी शर्तीची पूर्तता करावी लागते त्याप्रमाणेच मॅक्स दत्तक घेण्यासाठीही काही अटी आहेत.
पिंपरी - मुल दत्तक घेता येतं. त्यासाठी बरीच कायदेशीर प्रकिया आहे. त्याची जबाबदारी घेण्याइतके सक्षम पालक असल्यासच दत्तक देण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, तुम्हाला कुत्रा दत्तक घेण्यासाठीही एवढ्या प्रक्रियेतून जावं लागणार असेल तर आश्चर्य वाटू नये. मुक्या जनावरांचीही भाषा असते. त्यालाही भावना आणि प्रेम असतं. मात्र, त्याला व्यक्त होता येत नाही एवढंच. कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्यासोबत सावलीसारख्या वाढलेल्या पाळीव कुत्रा म्हणजेच मॅक्सला निगडी प्राधिकरणातील एका कुटुंबाला दत्तक द्यायचं आहे.
लॉकडाउन काळपासून भेडसावू लागलेल्या काही अडचणींमुळे हा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र, त्याचा योग्य सांभाळ करण्यासाठी सुजाण प्राणीप्रेमी पालक हवे आहेत. तशा आशयाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने अनेकांना या मॅक्सविषयी सहानुभूती वाटत आहे.
मॅक्स हा गोल्डन रिट्रिव्हर जातीचा अडीच वर्षाचा आहे. ओमकार लोखंडे या तरुणाने आत्तापर्यंत मॅक्सचा सांभाळ केला आहे. निगडीतील इन्सपिरिया मॉलच्या मागे एलिंगट रेसिडेन्सी येथे राहणारे हे कुटुंब. मॅक्स 30 दिवसांचा असल्यापासून लहान बाळाप्रमाणे त्याचा त्यांनी सांभाळ त्यांनी केला आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच उठल्यापासून झोपेपर्यंत सर्व हट्ट पुरविले जातात. आहारापासून ते झोपण्यापर्यंत सर्व काळजी घेतली जाते.
ज्याप्रमाणे मूल दत्तक घेण्यासाठी विविध अटी शर्तीची पूर्तता करावी लागते त्याप्रमाणेच मॅक्स दत्तक घेण्यासाठीही काही अटी आहेत. त्याची पूर्तता कुटुंबाला करावी लागणार आहे. शिवाय खर्चाची तयारी असेल तरच ते दत्तक दिले जाणार आहे.
दत्तक देण्याशिवाय आता माझ्याकडे पर्याय नाही. भावनिकरित्या त्याच्यात गुंतलो आहोत. मध्यंतरी आम्ही आठ ते दहा दिवस गावी गेलो असता त्याने काही खाल्ले नव्हते. जे कोणी दत्तक घेणार आहे त्यांनी मॅक्सचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा. मॅक्सला करमलं नाही किंवा त्याची वारंवार आठवण आल्यास काही दिवस आम्ही त्याला रोज भेटू. त्याने काही खाल्ले नसल्यास दत्तक देण्यासाठी पुन्हा विचार करावा लागेल. मॅक्ससाठी मोठे कुटुंब आणि लहान मुले घरात लागतील. तो बांधून राहू शकत नाही. नवीन व्यक्तीसोबत तो चांगला राहतो. भविष्यात काही खर्च करावा लागल्यास आर्थिक मदत करू. तशी कायदेशीर प्रक्रिया केली जाईल असं ओमकार लोखंडे यांनी म्हटलं आहे.
हे वाचा - पुणे जिल्ह्यात पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला
काय आहे मॅक्सचा खर्च व सवयी
रॉयल कॅनिन, मांसाहार, कर्ड राईस व इतर पोषक आहार मॅक्सला दिला जातो. मल्टिविटॅमिन्स, सलमॉन ऑईलसह महिन्याकाठी आठ ते दहा हजार आर्थिक खर्च आहे. तसेच त्याला फिरायला नेणे, कोम्ब करणे अंघोळ घालणे यासाठी मेहनत घ्यावी लागते.