मावळ : कंपनीच्या जनरल मॅनेजरवर हल्ला करणारा सूत्रधार अखेर गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

मुथुय्या हे ३० जूनला संध्याकाळी कंपनीतून घरी चालले असताना वडगाव येथील विशाल लॉन्स समोरील गतिरोधकाजवळ आरोपींनी त्यांच्या मोटारगाडीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली.

वडगाव मावळ (पुणे) : तळेगाव एमआयडीसीमधील युएमडब्ल्यु डॉन्गशिन कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर मुथुय्या सुबय्या बडेदरा (वय ५७, रा. टाटा हौसिंग सोसायटी, वडगाव मावळ, मूळ रा. बंगलोर, कर्नाटक) यांच्यावर हल्ला करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती या विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आशिष प्रकाश ओहळ (वय ३७, रा. विकासनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. पोलिसांनी करणकुमार चल्ला मत्तु (वय २३, रा. गांधीनगर, देहुरोड), बालाजी रमेश मुदलीयार (वय २७, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड), राकेश शिवराम पेरूमल (वय २५, रा. एम. बी. कॅम्प, देहुरोड) या हल्लेखोरांना यापूर्वीच अटक केली आहे. मुस्ताक जमील शेख (वय २५, रा. गांधीनगर, देहुरोड) या चौथ्या आरोपीला कोरोना झाल्याने तो उपचार घेत असून, त्याला ताब्यात घेणे बाकी आहे. 

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

मुथुय्या हे ३० जूनला संध्याकाळी कंपनीतून घरी चालले असताना वडगाव येथील विशाल लॉन्स समोरील गतिरोधकाजवळ आरोपींनी त्यांच्या मोटारगाडीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. काय झाले हे पाहण्यासाठी ते गाडी थांबवून बाहेर येत असताना दोन मोटारसायकलवरील चौघांनी त्यांच्या पायावर हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. मुथुय्या यांच्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते. तसेच, स्थानिक गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच, तांत्रिक तपासातून माहिती घेऊन त्यांनी गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आशिष ओहळ याने  आम्हाला दीड लाखाची सुपारी देऊन त्याला त्रास देत असलेल्या मुथुय्या यांना फ्रॅक्चर करण्यास सांगितले होते. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक उपनिरीक्षक विजय पाटील, प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, गणेश महाडिक यांच्या पथकाने दहा-बारा दिवस फरार असलेल्या आरोपींना व या हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला जेरबंद करण्याची कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest of mastermind who attacked the UMW Dongshin company's general manager at maval