esakal | पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

स्वातंत्र्यदिन म्हटला, की लोणावळा-खंडाळ्याचा बेत हमखास ठरलेला. स्वातंत्र्यदिनानिमीत्त येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.

पर्यटकांनो, लोणावळेकरांचं हे ऐका  

sakal_logo
By
भाऊ म्हाळसकर

लोणावळा (पुणे) : स्वातंत्र्यदिन (Independence Day) म्हटला, की लोणावळा-खंडाळ्याचा बेत हमखास ठरलेला. स्वातंत्र्यदिनानिमीत्त येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक (Tourists) गर्दी करतात. वर्षाविहार करताना निसर्गाचा आनंद घेतात. दर वर्षाप्रमाणे यंदाही अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी पर्यटकांनी लोणावळा-खंडाळ्यात येणे टाळावे. कोरोनाला घाबरून न जाता, त्य़ाचा समर्थपणे सामना कसा करता येईल, यासाठी सामाजिक बांधिलकीतून परस्पर सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्यावर पर्यटननगरीमध्ये आपले सदैव स्वागतच आहे, असे आवाहन लोणावळेकरांच्या वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संसर्ग रोखण्यासाठी 'पर्यटन बंदी'

पुण्या-मुंबईसह देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील ३३ पर्यटनस्थळांसह गर्दीची सर्व ठिकाणी यापूर्वीच सक्तीने बंद केली आहेत. मात्र, आपल्याच उत्साहामुळे आपण या संसर्गाला बळी पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रसार संसर्गातून होत असल्याने याचे संक्रमन रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून स्वत:च खबरदारी घ्यावी. तसेच, इतरांचेही रक्षण करावे, अशी भावना लोणावळेकरांनी व्यक्त केली आहे. १५ ऑगस्टला लोणावळा, खंडाळ्यात येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह यंत्रणांवर मोठा ताण येतो.

मात्र, त्रास होऊनही लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचे लोणावळेकरंकडून नेहमी स्वागतच झाले आहे. याच पर्यटकांच्या जिवावर लोणावळ्यातील अर्थव्यवस्था व अनेकांचे संसार उभे आहेत. पर्यटनामुळे अनेकांच्या व्यवसायात भरभराट होत आहे. लोणावळेकरही पर्यटकांना आनंद लुटण्यात मुभा देत असतात. प्रसंगी त्यांच्या होणाऱ्या चुकाही पोटात घालून माफ करतात. परंतु, व्यवसायाचा भाग सोडून कोविड संकटाचा सामना करण्यासाठी पर्यटकांनी आपल्या उत्साहाला मुरड घालून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोणावळ्यात गर्दी करणे टाळावे, असे आवाहन नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत ४५ जणांचा बळी 

मावळात आतापर्यंत कोरोनाने ४५ जणांचा बळी घेतला आहे, तर रुग्णसंख्या साडेबाराशेच्या वर गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपणही एका सुज्ञ नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे.

३०० जणांवर कारवाई

लॉकडाउनच्या काळात पोलिस व नगरपरिषद प्रशासनातर्फे विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग, पर्यटन बंदीचा आदेश मोडणाऱ्या ३०० जणांवर कायदेशीर कारवाई झाली आहे. यादरम्यान जवळपास पावणे तीन लाख रुपयांचा दंड करत खटलेही दाखल केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे गर्दी टाळण्यासाठी कार्ला, वेहेरगाव, वर्सोली टोलनाका, खंडाळा एक्झिट, रायवूड पार्क, भुशी आदी ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, विनापरवाना फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar

loading image