Ashwini Jagtap : आमदार अश्विनी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला दिली भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwini Jagtap visited district hospital chinchwad medical facility

Ashwini Jagtap : आमदार अश्विनी जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला दिली भेट

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी जगताप यांनी निवडून आल्यानंतर चौथ्याच दिवशी सोमवारी (ता. ६) नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी करून त्यांनी अनेक रुग्णांशी संवाद साधून वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला.

त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांसह रुग्णालयाच्या प्रशासनातील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रुग्णांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. आमदार झाल्यानंतर त्यांनी चौथ्याच दिवशी सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

दिवंगत आमदार जगताप हे देखील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम आग्रही असायचे. त्यांनी या रुग्णालयात आमदार निधीतून अनेक चांगल्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. आमदार अश्विनी जगताप यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांबाबत माहिती घेतली. अनेक रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात येणाऱ्या अनुभवाबाबत माहिती घेतली. काही महिला रुग्णांनी आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे आपली कैफीयत मांडली.

त्यांना धीर देत त्यांनी काहीही काळजी न करण्याचे आवाहन केले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळतात का, याची तेथील डॉक्टरांकडेही त्यांनी विचारणा केली. रुग्णालयातून नागरिक परत गेले नाही पाहिजेत, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. मी उद्या पुन्हा रुगणालयाला भेट देईल, असे म्हणत त्यांनी बजावून सांगितले.

त्यानंतर त्यांनी याच रुग्णालयात आयोजित केलेल्या जनऔषधी सप्ताह कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. व्ही. प्रतापवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

नवी सांगवीतील ऊरो व जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना चांगला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी नेहमीच प्रयत्न केले होते. मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे.

-अश्विनी जगताप, आमदार, चिंचवड विधभानसभा मतदारसंघ.

टॅग्स :Hospital