esakal | इच्छुकांना मतदारांचा कैवार
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : इच्छुकांना मतदारांचा कैवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिका निवडणूक (corporation election) सहा महिन्यांवर आली आहे. त्याची तयारी विद्यमानांसह माजी नगरसेवक आणि अन्य इच्छुकांनीही सुरू केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत गायब झालेले व फारसे चर्चेत नसलेल्या कार्यकर्त्यांनीही आपापल्या परिसरात जनसंपर्क कार्यालये सुरू केली आहेत. मतदारांचा कैवार त्यांना आला आहे. (Aspiring voters)

महापालिकेतील लोकप्रतिनिधींची पंचवार्षिक मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित आहे. २०१७ ची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली होती. २१ फेब्रुवारी मतदान व २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. त्यात भाजपने १२८ पैकी ७७ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता प्राप्त केली आहे. त्यापूर्वीची १५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागांवर समाधान मानून विरोधी पक्षाची भूमिका बघावी लागत आहे. ही सल भरून काढण्यासाठी महापालिका पुन्हा ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी नगरसेवकानेच दिली आरोपीच्या खूनाची सुपारी

त्यांचा राज्य सरकारमधील घटक पक्ष शिवसेनेने किमान ५० जागांवर विजय मिळवायचा संकल्प केला आहे. तर, काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसप, रिपब्लिकन, एमआयएम, आप अशा पक्षांचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत. महापालिकेतील सत्ता कायम राखण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी ‘बूथ सक्षमीकरण’मोहीम सुरू केली आहे. भाजपची एकला चलोरेची भूमिका आहे. त्यांच्या जोडीला आरपीआय (आठवले गट) असण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रित लढणार की स्वतंत्रपणे लढणार याबाबत अद्याप काहीही सूतोवाच नाहीत. काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून अनेक नवीन चेहऱ्यांनी आपापल्या भागात संपर्क कार्यालये सुरू केली आहेत. त्यांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

हेही वाचा: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

लसीकरणाचा आधार

महापालिकेतर्फे सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्या केंद्रांची माहिती एक दिवस अगोदर जाहीर केली जाते. त्या केंद्रांची यादी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपापल्या भागात व्हायरल केली जात आहे. समाजाच्या माहितीसाठी लसीकरण केंद्रांची माहिती नागरिकांना मिळणे, सामाजिकदृष्ट्या योग्य असले तरी, त्यामागील हेतू राजकीय असतो. ‘लसीकरण करून घ्या’ अशा आशयाचे फलकही अनेक ठिकाणी लागलेले आहेत, त्यांवर इच्छुकांची छायाचित्रेही आहेत.

जाहिरातबाजीवर भर

काहींनी रिक्षांवर जाहिराती करायला सुरुवात केली आहे. ‘युवा नेते’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘तरुण नेतृत्व’, ‘तडफदार नेता’, ‘आपला सेवक’, ‘आपला भाऊ’, ‘दादा’, ‘नाना’, ‘अण्णा’, ‘तात्या’ अशी नानाविध नामाभिधाने लावली आहेत. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, कोणाचा वाढदिवस, स्मृतिदिन यानिमित्त फ्लेक्सबाजी केली जात आहे.

loading image