एटीएम फोडणाऱ्या टोळक्‍याचा 'तो' मास्टर माईंड, पण एक चूक केली अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

  • एटीएम फोडणारा मास्टर माईंड जाळ्यात 
  • पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट पाचची कामगिरी 

पिंपरी : थरमॅक्‍स चौक ते केएसबी चौक रस्त्यावरील आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम फोडणाऱ्या टोळक्‍याचा मास्टर माईंड पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (युनिट 5) जाळ्यात सापडला. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी खंडोबामाळ चौकाजवळील एटीएम देखील फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मेहरबानसिंग तारासिंग डांगी (वय 25, धंदा-मजुरी, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) असे त्या मास्टर माईंडचे नाव आहे. पोलिस तपासात त्याचे अन्य साथीदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांची नावेही पुढे आली आहेत. युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरबानसिंग डांगी हा सेंट्रल चौकात येणार असल्याची खबर मिळताच शोधपथक तयार करण्यात आले. संबंधित त्या ठिकाणी डांगी आला. मात्र, त्याला पोलिस पथकाचा संशय आल्याने तेथून तो पळ काढू लागला. त्याला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या चार साथीदारांनी 8 जूनला रात्री 12 वाजता थरमॅक्‍स चौक ते खंडोबामाळ चौक रस्त्यावरील आयसीआयसीआय एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांची गाडी आल्याचे दिसताच हे सर्वजण तेथून पळून गेले. मात्र, काही वेळाने त्यांनी थरमॅक्‍स चौक ते केएसबी चौक रस्त्यावरील याच बॅंकेचे एटीएम फोडून त्यातील पैसे चोरल्याचे डांगी याने कबूल केले. या सर्व आरोपींनी लोणी काळभोर जवळील अवताडेवाडी येथील महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी चोरल्याचेही निष्पन्न झाले आहे. याच टोळक्‍याने मार्च महिन्यात लोणीकंद येथील एचडीएफसी बॅंकेचे एमटीएम फोडून चोरी केली आहे. पुढील तपासासाठी डांगी याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे, कर्मचारी फारुख मुल्ला, नितीन बहिरट, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्‍वर गाडेकर, भरत माने आदींनी वरील कामगिरी नोंदविली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atm machine blower arrested by police pimpri chinchwad