esakal | ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयातील आणखी एक काळाबाजार उघड
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयातील आणखी एक काळाबाजार उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) ऑटो क्‍लस्टर (Auto Cluster) कोविड रुग्णालयात (Covid Hospital) रुग्णाला (Patient) दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी चार डॉक्टरांना (Doctor) अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. येथील रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन (Remdesivir Injection) गैरमार्गाने मिळवून त्याची काळ्याबाजारात (Black Market) विक्री विकणाऱ्या ऑटो क्‍लस्टर कोविड रुग्णालयातील एका पुरुष परिचारकासह (ब्रदर) तिघांना पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली आहे. यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील 'काळाबाजार' पुन्हा एकदा समोर आला आहे. (Auto cluster uncovered another black market in Covid Hospital)

कोरोना रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी महापालिकेने ऑटो क्‍लस्टर येथे उभारलेल्या या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आले आहे. दरम्यान, येथे रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण शांतवन जाधव यांच्यासह, पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक भरत राळे, डॉ. सचिन श्रीरंग कसबे, ज्योत्स्ना दांडगे यांना अटक केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच येथे पुरुष परिचारक (ब्रदर) म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे (वय १९ रा. पिंपरी) याला रेमडेसिव्हिर इंजेक्शन जादा दराने विकताना पोलिसांनी अटक केली. यासह त्याचे साथीदार नितीन हरिदास गुंड (वय २३, रा. काळेवाडी), सागर काकासाहेब वाघमारे (वय २४ रा. काळेवाडी) यांनाही जेरबंद केले आहे.

हेही वाचा: "चौदा हजार द्या, नाहीतर रुग्णाला रस्त्यावर ठेऊन जाईन"

हे आरोपी इंजेक्शन जादा दराने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत नितीन गुंड याच्याशी संपर्क साधला असता ४० हजाराला एक याप्रमाणे दोन इंजेक्‍शनसाठी ऐंशी हजारांची मागणी केली. इंजेक्‍शन घेण्यासाठी डिलक्स रोड ते काळेवाडी रोड येथे येण्यास सांगितले. दरम्यान, पोलिसांचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी (ता. ७) दुपारी एकच्या सुमारास सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता ऑटो क्‍लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय दराडे याच्याकडून इंजेक्‍शन घेतल्याची कबुली आरोपींनी दिली.

आरोपींकडून २५ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, एक हजारांची रोकड, चार हजार ३८९ रुपये किंमतीची दोन इंजेक्‍शन असा तीस हजार ३८९ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

ऑटो क्लस्टर रुग्णालयातील घटनांचा होणार सखोल तपास

ऑटो क्लस्टर रुग्णालयात घडलेल्या घटना गंभीर असून या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरु आहे. ब्रदरला इंजेक्शन कुठून व कसे मिळाले. यामध्ये डॉक्टरांचा सहभाग आहे का याची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणासह रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी पैसे मागितल्याच्या प्रकरणाचाही सखोल तपास सुरु आहे. याबाबत उपायुक्त, सहायक आयुक्तांना सूचना दिल्या असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. अशाप्रकारे रुग्ण अथवा नातेवाईकांकडून आर्थिक लूट होत असल्यास ९१३४४२४२४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिस आयुक्तांनी केले आहे.