मीटरप्रमाणे धावणार रिक्षा; शहर पोलिसांचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

शहरातील अनेक सामाजिक संस्थांनीही याबाबत मागणी केली होती. त्याला यश आले आहे. यापुढे आता रिक्षाला मीटर बंधनकारक करण्यात येणार आहे. रिक्षाचालक काही पैशांसाठी मीटर नुसार जाण्यास नकार देतात.

पिंपरी - शहरातील रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक केले जाणार आहे. या आठवड्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरात आता मीटरप्रमाणेच रिक्षा धावणार आहेत. 

शहरात सुमारे वीस हजार रिक्षा आहेत. मात्र, अनेक रिक्षा भाडे आकारणी मीटरप्रमाणे न करता शेअर पद्धतीने करतात. दरम्यान, वाहतूक विभागाने रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी मीटर प्रमाणे नियमानुसार प्रवास भाडे आकारण्याबाबत चर्चा केली. त्यामध्ये रिक्षा संघटनांनी मीटरप्रमाणे प्रवासभाडे आकारण्याबाबत सकारात्मक दर्शविली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्थांनीही याबाबत मागणी केली होती. त्याला यश आले आहे. यापुढे आता रिक्षाला मीटर बंधनकारक करण्यात येणार आहे. रिक्षाचालक काही पैशांसाठी मीटर नुसार जाण्यास नकार देतात. भाडे नाकारतात, अशा रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. 

दरम्यान, या उपक्रमामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या शहरातील रिक्षाचालकही स्मार्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, ‘‘प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यानुसार शहरातील रिक्षांवर मीटरप्रमाणे भाडे आकारणी केली जाईल.’’ प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, मीटरची सक्ती केली जात असताना नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांवरही कडक कारवाईचा बडगा उगारणे आवश्‍यक आहे. रिक्षाचालकांच्या मूलभूत समस्यांकडेही लक्ष देण्यासह चांगल्या ठिकाणी स्टॅंड उपलब्ध करून द्यावेत. तरच, शहर व रिक्षाचालक खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील. अनेकदा मीटरनुसार भाडे देण्याची प्रवाशांचीच मानसिकता नसते. त्यामुळे या उपक्रमाबाबत नागरिकांमध्येही जनजागृती होणे गरजेची आहे, असे क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे यांनी सांगितले.

तर कारवाईचा बडगा
वाहतूक पोलिसांचे पथक रिक्षाचालक व नागरिकांशी संवाद साधून मीटर बाबत चौकशी करणार आहे. रिक्षाचा मीटर सुरू आहे का, मीटरप्रमाणे भाडे आकारले जात आहे का, हे तपासले जाणार आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नसल्यास संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाणार आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय होऊ शकते
- रिक्षा स्टॅंडवर दरपत्रक लावून कोणत्या टप्प्यासाठी किती भाडे होईल, हे त्यावर नमूद असेल. 
- रिक्षा व्यवसायात येईल स्मार्टपणा
- तिकिटावरून वादाचे प्रसंग घडणार नाही. 
- रिक्षाचालक अव्यावसायिक पद्धतीने व्यवसाय करीत असल्याची ओळख मिटेल. 
- प्रवासी व रिक्षाचालक दोघांचाही होईल फायदा.

अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी​

मीटरची अंमलबजावणी झाल्यास नियमानुसार योग्य भाडे आकारले जाईल. प्रवाशांनाही सोयीचे ठरेल. बदल्यात काळानुसार रिक्षाचालकांनीही बदलणे आवश्‍यक आहे. येत्या गुरुवारपासून रिक्षाचा मीटर डाउन करून शहरात या उपक्रमाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. 
- कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autorickshaw drivers in the city will be required to pay metered fare