अति झालं! पुण्यात पोलिसालाच दिली नोकरी घालविण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

फिर्यादी निढाळकर यांना शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेत फिर्यादीला दुखापत झाली.

पुणे : भांडणाच्या घटनेची परस्परविरोधी तक्रार लिहून घेणाऱ्या पोलिसालाच एकाने थेट नोकरी घालविण्याची धमकी देत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एरंडवणे पोलिस चौकीत घडली. 

थोरातांचा भाजपसोबत शिवसेनेला टोला; तरी म्हणतात, 'सरकार स्थिर'!​

राहुल भरम (रा. केळेवाडी, कोथरुड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी कौस्तुभ निढाळकर (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निढाळकर हे कोथरुड पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. भरम आणि राहुल वाघ यांची शुक्रवारी भांडणे झाली होती. त्यावेळी दोघेही एरंडवणा पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. तेव्हा निढाळकर हे राहुल वाघ यांची तक्रार लिहून घेत होते. निढाळकर यांनी पहिल्यांदा वाघची तक्रार लिहून घेत भरमला बाजूला बसण्यास सांगितल्याचा भरमला राग आला. त्यामुळे त्याने निढाळकर यांना "त्याची काय अगोदर तक्रार लिहून घेताय, तुम्ही मला बाजूला बसण्यास काय सांगता ? मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय? तुमची मी नोकरी घालवीन' अशा प्रकारे धमकी देत शिवीगाळ केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक घाव अन् दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न लागला मार्गी​

या प्रकारानंतर निढाळकर यांनी जाब विचाऱ्यानंतर त्यांच्यात वाद वाढले. त्यानंतर त्याने फिर्यादी निढाळकर यांना शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेत फिर्यादीला दुखापत झाली. या घटनेनंतर फिर्यादी यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune youth threatened and abused police for not writing a complaint

Tags
टॉपिकस
Topic Tags: