‘इलेक्टिव्ह’ शोधा; पण ‘नारायण’ला जपा

महापालिका निवडणुकीची आता कुठे चर्चा सुरू झाली आहे. सत्ता भाजपची राहील की राष्ट्रवादीची का शिवसेनेकडे जाईल, यावर लोकांचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Politics
PoliticsSakal

महापालिका निवडणुकीची आता कुठे चर्चा सुरू झाली आहे. सत्ता भाजपची राहील की राष्ट्रवादीची का शिवसेनेकडे जाईल, यावर लोकांचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ कोणाकोणात आहे, या चाचपणीत नेते मंडळी आहेत. बेंबीच्या देठापासून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळीही उमेदवारी मिळणार नाही. पण, हे असं कसं चालेल? त्यांच्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ निर्माण होण्यासाठी पक्ष का प्रयत्न करत नाहीत, हाच कळीचा मुद्दा आहे. पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीतील ‘नारायण’ प्रत्येक पक्षात आहे. त्यांना प्रत्येक पक्षाने बळ देण्याची गरज आहे.

उद्या दुपारी बारा वाजता चौकात आंदोलन आहे. तू ये..., असा निरोप मिळाला की, ‘त्याला’ चैन पडत नाही. ती रात्र कशीबशी तळमळत काढतो. अंगात उत्साह भरलेला असतो. उद्याच्या कामांची यादी त्याच्या डोळ्यासमोर तरळते. सकाळी लवकर उठतो. पक्ष कार्यालयात जातो. स्वतःसाठी प्रथमच फुल्ल कप स्पेशल चहा मागवतो. कारण आज त्याला कोणी विचारणारं नसतं. ताजातवाना झाला. आतील खोलीतील एका कोपऱ्यात ठेवलेले झेंडे बाहेर काढले. त्यांची निसटलेली गुंडाळी नीट केली. धूळ झटकली. पक्षाच्या चुरगाळलेल्या फलकाची घडी घातली. कामांची यादी त्याला तोंडपाठ होती. तरीही सवयीप्रमाणे यादीवर पुन्हा एकदा नजर टाकली आणि एक-एक काम संपवत राहिला. नेते मंडळी, सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी प्रथमच कार्यालयात येणार असल्याने तो आनंदित आहे. सगळी झाडलोट केली. टेबल-खुर्च्या मांडल्या. मिनरल वॉटरच्या पॅकबंद बाटल्या ठेवल्या. बुके मागविले. सगळी तयारी बघून सन्माननीयांची शाबासकी मिळणार होती.

आता तो यादीतील पुढच्या कामाकडे वळला. प्रत्येकाला फोन करून, ‘साहेब, आज आंदोलन आहे. आधी ऑफिसला या, मग मिळून चौकात जायचे आहे. लवकर या, नेत्यांचा निरोप आहे’, असे सांगत राहिला. काहींचे फोन बंद होते. काहींनी कॉल रिसिव्ह केले नाहीत. काहीजण आउट ऑफ रेंज होते. काहींनी कॉल कट केले. ज्यांनी घेतले त्यांनी थातूरमातूर कारणे सांगितली. काहींनी फक्त ‘हं’ म्हणून फोन बंद केले. काहींना आंदोलनाची कल्पनाच नव्हती. काहींनी येतो म्हणून सांगितले. काहींनी थोड्या उशिरा येण्याचे आश्वासन दिले. अशा या फोनाफोनीमुळे त्याची काहीशी दमछाक झाली. मग आणखी एक फुल्ल कप स्पेशल चहा मारला. आणि कोणाकोणाला फोन केले, याची यादी तयार करायला घेतली. ‘नक्की येतो’ असे सांगणाऱ्यांची नावे दीडशे झाली. अकरा वाजत आले. काही छोटेछोटे कार्यकर्ते येवू लागले. चार-पाच सन्माननीय कार्यालयाला पाय लावून निघून गेले. बाकीच्यांचे फोन येत होते. ‘नेते आले का? कधी येणार आहेत? आंदोलन किती वाजता आहे?’ वगैरे वगैरे.

Politics
शुल्क वसुल होण्यासाठी शाळा लढवतात नवनवीन शक्कल

प्रत्येकाला उत्तर देता देता त्याच्या डोक्यात विचार सुरू होता. आंदोलनाचा विषय असलेला फ्लेक्स अजून आलेला नाही. मात्र, तेवढ्यात फ्लेक्स घेऊन पोऱ्या पोहोचला आणि इकडे तो निवांत झाला.

नेत्यांची वाट बघून शेवटी त्याने फोन केला. कार्यालयात यायला किती वेळ लागेल. तर त्याला उत्तर आले, ‘तू थेट चौकातच ये. आंदोलन झाल्यावर कार्यालयात येतो.’ त्याची पुन्हा धांदल उडाली. अकरा वाजले होते. झेंडे, बॅनर, फ्लेक्स घेऊन कार्यालयाबाहेर आला. कुलूप लावले. दोन-तीन वेळा ते ओढून बघितले. एक रिक्षा थांबविली. त्यात साहित्य कोंबले. आंदोलनाच्या ठिकाणी पोचला. ऊन तळपत होते. अजून एकही माणूस आलेला नसतो. दुपारी बारा वाजता येरे, असा निरोप देणारे सन्माननीय पोहोचलेले नसतात. चौकातील एका सावलीत सगळे साहित्य घेऊन तो उभा असतो. नेत्यांची वाट बघत.

साडेअकरा, बारा, साडेबारा झाले, तरी सन्मानीय आले नव्हते. एक वाजता एक-एक जण आलिशान मोटारीतून आले. नेते उतरले. यातील एकानेही झेंडा घेतला नाही. घोषणांना सुरवात होते. यात सर्वात टिपेला जाणारा आवाज त्याचा असतो. पंधरा मिनिटांचे आंदोलन संपते. कॅमेऱ्यांसमोर अर्धा-पाऊण तास बाईट होतात. पांगापांग होते. पुन्हा सगळे साहित्य घेऊन तो कार्यालयात येतो. काही वेळाने नेते, सन्माननीय येतात. काहीतरी खायला मागविले जाते. हास्यविनोद रंगतात. तो प्रत्येकाला चहा-नाश्त्याच्या डिश देत राहतो. मग मध्येच कोणीतरी त्याला चेष्टेची टपली मारतो. तेवढ्यानेही तो खुलतो. चहा-नाष्टा संपतो. सगळे उठून निघू लागतात. मग तोही रिकाम्या डिश उचलत राहतो. जाताना एकानेही त्याची विचारपूस केलेली नसते. दुपारचे अडीच झालेत. केवळ दोन कप चहावर तो आहे. त्याला भूक लागलेली आहे. पण त्याच्यासमोर कामाचा डोंगर असतो. कार्यालयातील साहित्याची आवराआवर करायची असते.

Politics
पिंपरी : राष्ट्रीय लोकअदालीतून न्यायालयाला मिळाली इतकी तडजोड रक्कम

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्याचा फोटो नसतो, नावही नसते. त्याचा चेहरा कसानुसा होते. तो सामान्य कार्यकर्ता म्हणून जगतो. सामान्य कार्यकर्ता म्हणून मरतो. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ नसल्याचा ठपका मारत ‘सिस्टिम’ त्याला उमेदवारी देत नाही आणि त्याच्यातील ‘इलेक्टिव्ह मेरिट’ काही प्रयत्नही करत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील असे ‘नारायण’ प्रत्येक पक्षात आहेत, जे दुसऱ्यांच्या मांडवात बुंदीच वाटण्याचे काम वर्षानुवर्षे करत आहेत. त्यांना बोहला कधी दाखविणार. कारण ‘नारायण’ संपत आलेत. त्यांना आताच बळ द्या. अन्यथा बेंबीच्या देठापासून घोषणा द्यायलाही कोण उरणार नाही!...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com