...तरच पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा रिक्षांचा गजकर्ण दूर होणार!

अविनाश म्हाकवेकर
Sunday, 24 January 2021

‘स्मार्ट सिटी’तील प्रशस्त चौक आणि रस्ते रिक्षांनी बकाल केले आहेत. वर्षानुवर्षे विनामीटरची दादागिरी, रहदारीला अडथळा आणणारा बेमूवर्तपणा, गणवेशापासून वाहनाच्या स्थितीपर्यंत एकही नियम न पाळणारे चालक आणि या साऱ्याला पाठीशी घालणाऱ्या संघटना व नेते याला जबाबदार आहेत. मात्र, आता त्यांना वठणीवर आणणारे पहिले पाऊल पोलिस आयुक्तांनी उचलले आहे. मीटर व्यवसाय सक्तीचा केला आहे. आता दुसरे पाऊल लोकांनी उचलायचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहर अतिशय सुंदर आहे. पुण्यात गुदमरायला होतं आणि इथं मोकळा श्‍वास मिळतो. रस्त्यांपासून टाऊनशीपपर्यंत सगळीकडे प्रशस्तपणा आहे. आता तर मेट्रो धावणार आहे. मात्र, नगरसेवकांपासून नेत्यांपर्यंत आणि नागरिकांपासून विशिष्ट संघटना यांच्यामधील काही घटकांना याचे मोल नाही. छोट्या शहरांमधील रस्ते जेवढ्या रुंदीचे आहेत, तेवढे इथले पदपथ आहेत. परंतु, त्यावर अतिक्रमण करणारी आणि ते वाढवून हफ्तेखोरी करणारे महाभाग येथे निर्माण झाले आहेत. शहरातील असा एकही आजी-माजी नगरसेवक नाही की त्याच्या प्रभागात हे चालत नाही. असेच ग्रासलेपण वारेमाप वाढलेल्या रिक्षांनी आणले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मार्ट सिटीतील प्रत्येक चौक, रस्ता किंवा मोकळ्या जागेत रिक्षाचालक टोळक्‍याने थांबलेले असतात. मासळी बाजारासारखा कलकलाट करून जा-ये करणाऱ्यांना बोलवत असतात. एकाच्याही अंगावर गणवेश नसतो. बॅच तर दूरच राहिला. रिकाम्या वेळेत रस्त्यावर पिंका आणि फाटलेल्या जीन्स व बनियनसारखे टी-शर्ट, चेहऱ्यावर बेफिकिरी असे दृश्‍य दिसल्यावरच लोक बाजूने वळतात. अतिशय बेशिस्तपणा त्यांच्यात आहे. रस्त्यावर अचानक ब्रेक लावणे, चौकात दुहेरी-तिहेरी थांबून रहदारीला अडथळा करणे अशी सर्रास पद्धत आहे. चौक इतके मोठे असूनही वाहतूक कोंडी किंवा गर्दी होण्यास केवळ या रिक्षा कारणीभूत आहेत. वर्षानुवर्षे बातम्यांचा विषय होतो, तरीही काही फरक पडत नाही. पोलिस आणि रिक्षा संघटना नेत्यांची मिलिभगत याला कारणीभूत आहे. मते जातील भीतीने आमदार-खासदार बोलत नाहीत, आपल्याच भागातील पोरं म्हणून नगरसेवक आवाज उठवत नाहीत, हप्ते मिळतात म्हणून पोलिस कारवाई करत नाहीत आणि मिंधेपणातून नेते शिस्त लावू शकत नाहीत, अशा साऱ्या स्थितीत सामान्य नागरिकाने करायचे काय? मीटरऐवजी चालक सांगेल ते भाडे देऊन निमूट प्रवास करायचा, की शेअर-ए-रिक्षाच्या नावाखाली बकऱ्यांमध्ये कोंबल्यासारखे बसून श्वास रोखत बसायचे? असे दोनच पर्याय त्याच्या समोर उरतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विनामीटर पद्धतीला लोक कंटाळले आहेत. दबाव गट किंवा जागरूक प्रवासी नसल्याने रिक्षाचालक नेते आणि त्यांच्या संघटनांचे फावत गेले. आता अति झाले होते. परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या वारेमाप वाढली आहे. त्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढतच निघाला होता. मात्र, पोलिस आयुक्तांनी मीटरनेच व्यवसाय करण्याचा आदेश काढून एक चांगले पाऊल टाकले आहे. आता दुसरे पाऊल लोकांनी टाकायचे आहे. मीटरच्याच रिक्षातून प्रवास करायचा आणि नकार मिळाल्यास पोलिसांच्या क्रमांकावर तक्रार द्यायची, असा चंग जर बांधला तर सगळी व्यवस्था नीट होईल. अधिकृत तक्रार करणे आणि पुरावा जपून ठेवणे अशा दोन गोष्टी जर नीटपणे केल्या, तर पोलिस कारवाई करणे भाग होईल.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त, मीटरचे आदेश देऊन भागणार नाही. धडाधड कारवाई करा. बेकायदा थांबे उखडून काढा. गणवेशापासून वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकासह संबंधित रिक्षा संघटनेवर घाव घाला. अशी सुरुवात तुम्ही केली, तर नागरिकांना विश्वास वाटेल. ते तुमच्याकडे अधिक विश्वासाने येतील. तरच बेकायदा रिक्षाचालकांचे गजकर्ण  दूर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: avinash mhakwekar writes about rickshaws

टॉपिकस
Topic Tags: