हौसेला मोल नसतंच; 'रामा'साठी त्यांनी मोजले साडेतेरा लाख!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

बैल व बैलगाडा शर्यतीची प्रचंड आवड असल्याने तब्बल साडेतेरा लाखांचा बैल खरेदी केला. इतर बैलांपेक्षा अतिशय तरबेज असा हा "रामा' नावाचा बैल काही क्षणातच शर्यत पूर्ण करतो अशी या बैलाची ख्याती.

पिंपरी - खेड तालुक्‍यातील निघोजे येथील 25 वर्षीय बापू तुकाराम आल्हाट. शेती व कंपनीत कामगार पुरविण्याचा व्यावसाय. बैल व बैलगाडा शर्यतीची प्रचंड आवड असल्याने तब्बल साडेतेरा लाखांचा बैल खरेदी केला. इतर बैलांपेक्षा अतिशय तरबेज असा हा "रामा' नावाचा बैल काही क्षणातच शर्यत पूर्ण करतो अशी या बैलाची ख्याती. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी केवळ आवड म्हणून इतका महागडा बैल खरेदी केल्याने "हौसेला मोल नसते' याचा प्रत्यय येथे येतो. आज ना उद्या शर्यतीला पुन्हा परवानगी मिळेल या अपेक्षेने कुटुंबातील सदस्याप्रमाणे आल्हाट कुटुंबीय बैलांची जोपासना करीत आहे. या कुटुंबासाठी गुरुवारी (ता. 17) साजरा होत असलेल्या बैलपोळा सणाचा उत्साह म्हणजे दिवाळी सणापेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी व बैल यांचे जिव्हाळ्याचे नाते. प्रत्येक शेतकरी बैलांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत असतात. बैलगाडा शर्यत शौकिनांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. दरम्यान, काही वर्षांपासून शर्यतीवर बंदी असली तरी शर्यतीच्या बैलांची खरेदी करण्यासह त्यांची जोपासना करण्याची अनेकांची आवड कायम आहे. अशाच प्रकारे बापू आल्हाट यांनी आपली आवड जोपासत तब्बल तेरा लाख 51 हजार रुपये किंमतीच्या बैलाची खरेदी केली. 'रामा' नावाच्या या बैलाचा जन्म माळशिरस येथील असून सुरुवातीला मावळातील संदीप विधाटे यांनी त्याची मूळ मालकाकडून खरेदी केली. त्यानंतर काही दिवसांनी विधाटे त्यांच्याकडून आल्हाट यांनी 'रामा' चे पालकत्व स्विकारले. हा बैल बेरड जातीचा असून शर्यतीसाठी घाटात उभा केल्यास काही क्षणातच हवेच्या वेगात शर्यत पूर्ण करतो, अशी त्याची ख्याती आहे. अवघ्या तीन वर्षाच्या या बैलाची धावण्याची क्षमता इतर बैलापेक्षा कैक पटींनी अधिक आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आल्हाट कुटुंबियांकडून त्याची जीवापाड काळजी घेतली जाते. अत्यंत कमी वयात धावण्याची प्रचंड क्षमता असल्याने त्याला पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांसह इतरही शेतकरी उत्सुकतेने येत असतात. 

आल्हाट यांच्याकडे एकूण सहा बैल असून दरवर्षी बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असतो. बैलांना दही, दुधाने अंघोळ, शिंगाणा रंगरंगोटी, सुंदर सजावट, गोडधोड नैवेद्य यासह मिरवणूक काढून देवदर्शन घडविले जाते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असा आहे खुराक 
पहाटे पाच वाजता पाणी देणे, त्यानंतर वाळलेल्या कडब्याची कुट्टी, हरभरा, गव्हाचा भरडा, शेंगदाण्याची पेंड, दहा ते बारा गावरान अंडी, त्यानंतर कडब्याची ओली वैरण, नऊच्या सुमारास गावरान तूप टाकून गव्हाचे गोळे देऊन पाणी पाजून काही वेळाने पुन्हा कुट्टी टाकायची. त्यानंतर 12 ते 3 आहाराला पूर्ण विश्रांती. सायंकाळी पुन्हा सकाळप्रमाणेच खुराक दिला जातो. दिवसभरात सहा ते सात किलोचा खुराक  दिला जातो. यासह दर काही दिवसांनी शरीराची मॉलिश तसेच धावण्याची क्षमता कायम रहावी यासाठी नदीला पोहायलाही नेले जाते. 

ही आहेत 'रामा'ची वैशिष्ट्ये
- अवघ्या तीन वर्षात धावण्याची प्रचंड क्षमता
- इतर बैलापेक्षा अतिशय तरबेज
- स्वभावाने शांत
- उंची 4 फूट 8 इंच
- लांबी 7 फूट
- टोकदार 11 इंच शिंग
- दिसायला देखणा, रुबाबदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bapu Alhat passion bull worth thirteen lakh 51 thousand rupees