Athletics Track : ट्रॅक अभावी अ‍ॅथलेटिक खेळाडूंमध्ये निराशा

भोसरी येथील इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एकमेव असलेला इपीडीएम पीयूस्प्रे ट्रॅक गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे.
Sant Dnyaneshwar Sports Ground
Sant Dnyaneshwar Sports Groundsakal

भोसरी - येथील इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एकमेव असलेला इपीडीएम पीयूस्प्रे ट्रॅक गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अ‍ॅथलेटीक खेळाडूंना सराव करता येत नसल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे. जिल्हास्तरावर झालेल्या अ‍ॅथलेटीक स्पर्धेतही पिंपरी- चिंचवड शहरातील खेळाडू मागे पडल्याचे प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील ट्रॅक तातडीने उभारण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.

संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलातील इपीडीएम पीयूस्प्रे ट्रॅकची दुरवस्था झाल्याने मार्च महिन्यात हा ट्रॅक बदलण्याचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात आले. कामासाठी काही भागातील ट्रॅक खोदण्यात आला. मात्र अद्यापही या ट्रॅकचे काम पूर्ण होऊ शकले नाही. या क्रीडा संकुलात अॅथलेटिकच्या पंचवीस खेळ प्रकाराचा सराव खेळाडू करतात. मात्र महापालिका परिसरात अशा प्रकारचा हा एकमेव ट्रॅक असल्याने शहरातील अ‍ॅथलेटीक खेळाडू सरावाला मुकले आहेत.

त्यातच ३० सप्टेंबर आणि १ ते ३ आक्टोबरला पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शालेय क्रीडा स्पर्धा महापालिकेला बालेवाडी स्टेडिअममध्ये घ्यावी लागणार आहे. या स्पर्धेत अडीच ते तीन हजार सहभागी होणाऱ्या खेळाडूंचीही गैरसोय होणार असल्याचे महापालिकेच्या क्रीडा विभागाने सांगितले आहे.

त्याचप्रमाणे या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना ट्रॅकच उपलब्ध नसल्याने त्यांची सराव करण्यासाठीची अडचण निर्माण झाली आहे. काही खेळाडू बालेवाडीतील ट्रॅकवर सराव करत आहेत. मात्र सर्वच खेळाडूंना आर्थिक आणि वेळेअभावी बालेवाडीत सराव करण्याच्या अडचणी येत आहेत.

राष्ट्रीय़ अ‍ॅथलेटीक खेळाडू मधुरा खांबे हिने सांगितले, की गेल्या वर्षी झालेल्या अ‍ॅथलेटीक स्पर्धेत चार राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आला. मात्र या वर्षी ट्रॅकअभावी पुरेसा सराव झाला नसल्याने जिल्हा स्तरावरील निवडीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तर अ‍ॅथलेटीक खेळाडू अनमोल तपशाळकर याने सांगितले, की इंद्रायणीनगरातील ट्रॅक बंद झाल्यावर मोकळ्या मैदानावर धावण्याचा सराव केला. पावसामुळे मातीच्या मैदानावर धावण्याचा सराव करताना त्रास झाला. सरावाअभावी बालेवाडीतील ट्रॅकवर धावताना दुखापत झाल्याने सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तर स्पर्धेस मुकावे लागले.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाला संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ट्रॅकचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या मागणीचे पत्र वेळोवेळी दिले आहे. ट्रॅकचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्थापत्य विभागाकडे पाठपुरावाही सुरू आहे.

- मिनीनाथ दंडवते, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.

इंद्रायणीनगरातील क्रीडा संकुलातील इपीडीएम पीयूस्प्रे ट्रॅक, टेनिस कोर्ट आणि लॉन्सचे काम सुरू आहे. पावसात ट्रॅकचे काम करता येत नसल्याने कामाचा वेग मंदावला आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्यास ट्रॅकचे काम सुरू करण्यात येईल. येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल.

- मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य-उद्यान व क्रीडा विभाग, महापालिका.

जिल्हा स्तरीय आणि राज्यस्तरीय अ‍ॅथलेटीक स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचा दबदबा राहिलेला आहे. मात्र खेळाडूंच्या सरावाअभावी बालेवाडीत ९ सप्टेंबरला संपलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शहरातील विजेत्या खेळाडूंची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत घटली आहे. याचा मानसिक दबाव पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्येही खेळाडूंवर येण्याची शक्यता आहे.

- चंद्रशेखर कुदळे, राष्ट्रीय कोच, खजिनदार, पिंपरी-चिंचवड अ‍ॅथलेटीक असोसिएशन

दृष्टीक्षपात नवीन इपीडीएम पीयूस्प्रे ट्रॅक

  • लांबी – ४०० मीटर

  • रुंदी – १०.५ मीटर

  • एका वेळेस धावू शकणाऱ्या खेळाडूंची संख्या – ८

  • लॉन्स, टेनिस कोर्ट नुतनीकरण व ट्रॅक एकूण खर्च – ४ कोटी रुपये

खेळाडू आणि प्रशिक्षकांची मागणी

-नवीन ट्रॅक उभारणीपर्यंत सध्या असलेल्या ट्रॅकवर सरावास परवानगी द्यावी.

-ट्रॅक ऑलंपिक धर्तीवर बनवला जावा.

-ट्रॅकला अथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे मानांकन घ्यावे.

-ट्रॅकचे काम तातडीने पूर्ण करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com