esakal | भोसरीत रस्त्यावर सांडलेलं पाणी प्यायल्यानंतर 8 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

sheeps

रस्त्यावर सांडलेले पाणी प्यायल्या. पाणी प्यायल्यावर अचानक ५ -६ मेंढ्या तडफडू लागल्या आणि जाग्यावरच लोळण घेत पडल्या.

भोसरीत रस्त्यावर सांडलेलं पाणी प्यायल्यानंतर 8 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तब्बल आठ मेंढ्यांचा तडफडून अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भोसरी एमआयडीसी ‘जे ब्लॉक ४७०’ येथे बुधवारी (ता.७) ही घटना  घडली. मादी जातीच्या मेंढ्यांचा यात समावेश आहे. आणखी दहा-बारा मेंढ्यांसह काही शेळ्यांची अत्यावस्था आहे. या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने धनगर बांधवांना धक्का बसला आहे. 

याबाबत माहिती अशी की,  थेरगाव - दत्तनगर येथील रहिवासी असलेले भिवा शिवाजी कोकरे, दत्तात्रेय सुभाष खरात यांच्या मालकीच्या या मेंढ्यां आहेत. कोकरे व  खरात यांनी या बकऱ्या नेहमीप्रमाणे चरावयास सोडल्या. भोसरी एमआयडीसीत नजीकच असलेल्या औद्योगिक वसाहतीत मेंढ्या व बकऱ्या चरत होत्या. त्यांचे पोट भरल्यावर त्या रस्त्यावर सांडलेले पाणी प्यायल्या. पाणी प्यायल्यावर अचानक ५ -६ मेंढ्या तडफडू लागल्या आणि जाग्यावरच लोळण घेत पडल्या. हा प्रकार बघून मालकालाही काही समजले नाही त्याने धावाधाव केली. मात्र, अन्य मेंढ्यांही तशा तडफडू लागल्या एक-दोन नव्हे तर ८ मेंढ्या जागीच गतप्राण झाल्याने खळबळ उडाली. मालकाच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याने शहरातील धनगर बांधवांना धक्काच बसला.

पिंपरी चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोकरे व  खरात यांचे मोठे नुकसान झाले आहे. विषारी औषध प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाज परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी व्यक्त केला. दरम्यान, औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. येथील कारखान्यांतून राजरोसपणे उघड्यावर तसेच नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत.   भिवा कोकरे म्हणाले, ‘‘ते ऍसिडयुक्त पाणी असावे. धनगर समाज लॉकडाउनमुळे पूर्णतः बेकारीत आहेत.  आता आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.’’ दत्तात्रय  खरात  म्हणाले, ‘‘औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून उघड्यावर सोडण्यात येणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी पिल्याने या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.’’

हे वाचा - प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस

याबाबत अद्याप तत्काळ पशुसंवर्धन विभागालाही कळविण्यात आले नाही. पण याठिकाणी असलेल्या एका केमिकल कंपनीतून असेच प्रदूषित रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी पिऊन आठ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मृत मेंढ्यांचे  शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

loading image