पिंपरी-चिंचवडला स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी-चिंचवडला स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक अॅड. नितीन लांडगे यांनी तर, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवडेतील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्थायी समितीत भाजपचे बहुमत असल्याने लांडगे यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर शुक्रवारी (ता. ५) अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. भाजपकडून नितीन लांडगे यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. गेल्या चार वर्षात एकही पद लांडगे यांना मिळाले नव्हते. शेवटच्यावर्षी त्यांना स्थायीचे अध्यक्षपद मिळाले. दरम्यान, मावळते अध्यक्ष संतोष लोंढे हे भोसरी गावठाण प्रभागाचेच प्रतिनिधीत्व करत आहेत. सलग, दुसऱ्यांदा याच प्रभागाला स्थायीचे अध्यक्षपद मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे नितीन लांडगे हे पुत्र आहेत. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये नितीन लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून ते नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना कोणतेही महत्वाचे पद मिळाले नव्हते. भाजपमध्येही मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. शेवटच्यावर्षी नितीन लांडगे यांना थेट स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, चालू पंचवार्षिकमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे चारवेळा, तर एकवेळा चिंचवडकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद राहिले आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागाचे नेतृत्व करणारे व स्थायी समिती अध्यक्ष झालेले दोन नगरसेवक चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक होते. 

महापालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात शुक्रवारी (ता. 5) रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत.

स्थायी समितीत असे आहे पक्षीय बलाबल!

भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे,  सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे; अपक्ष नीता पाडाळे (भाजप संलग्न);  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 आणि अपक्ष 1 सदस्य असे बलाबल आहे. या जोरावर भाजपचे लांडगे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com