'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप

'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप

पिंपरी : चिंचवडगावातील सत्तर वर्षीय विठ्ठल कुलकर्णी. त्यांनी 2018 मध्ये आपले लॅन्डलाइन कनेक्‍शन बंद केले. परंतु अद्याप त्यांना अनामत सुरक्षा रक्कम परत मिळू शकली नाही. ही एकाची समस्या नसून, हजारो लॅन्डलाइन ग्राहकांची आहे. ही ज्येष्ठ मंडळी गेल्या अडीच वर्षांपासून सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी धडपडत आहे. बीएसएनएल कार्यालयाची उंबरठे झिजवत आहे. मात्र, त्यांना 'आम्हास काही सांगता येत नाही' असे उत्तर मिळत असल्याने अनेक जण परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

'बीएसएनएल है, तो भरोसा है', असे बिरुद मिरविणाऱ्या भारत संचार निगमने त्यांच्याच ग्राहकांना मनस्ताप दिला आहे. शहरात 29 हजार लॅन्डलाइन आणि ब्रॉडब्रॅन्ड ग्राहकांची संख्या आहे. कनेक्‍शन घेतला प्लॅननुसार सुरक्षा ठेव घेण्यात येते. 'बीएसएनएल'कडून घेण्यात आलेली अनामत रक्कम साधारण दोन ते तीन हजार रुपये आहे. कनेक्‍शन बंद केल्यानंतर ही रक्कम पुढील एक दोन महिन्यांत देणे बंधनकारक आहे. त्यांना 'सिक्‍युरिटी डिपॉझिट जमा होईल' असा मजकूर संदेश मिळाला. परंतु, ही रक्कम न दिल्याने हजारो ग्राहकांनी "बीएसएनएल'कडे तक्रारी दाखल केल्या आहेत. 'बीएसएनएल'चे लॅन्डलाइन कनेक्‍शन बंद करून दोन वर्षे झाली, तरी ग्राहकाला अनामत रक्कम मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. टेलिफोनच्या बिलाची रक्कम भरली नाही म्हणून महिनाभरात कनेक्‍शन बंद करणाऱ्या प्रशासनाने अनामत रक्कम वर्षे रखडवली आहे. त्यांना प्रतिसाद कधी मिळणार, असा प्रश्‍न या ग्राहकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्राहकांनी अनामत रकमेबाबत पाठपुरावा केला असता, 'पैसे तुमच्या घरी चेकने येतील आणि मुंबईहून येतील,' असे सुरुवातीला सांगितले जाते. अनेक महिने वाट पाहून पुन्हा ग्राहक सेवा केंद्रांत गेले असता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली जात नाही. सध्या चिंचवडगावातील विठ्ठल कुलकर्णी यांनी लॅन्डलाइन कनेक्‍शन बंद केले. त्यांच्याबाबतीत हाच प्रकार घडला. कनेक्‍शन बंद करून दोन वर्षे होऊन गेली तरी त्यांना अद्याप अनामत रक्कम मिळालेली नाही. पाच ते सात वेळा कार्यालयाच्या हेलपाटे मारूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्याप्रमाणेच इतरही ग्राहकांचा परतावा मिळालेला नाही. 

सध्या बीएसएनएलची परिस्थिती सर्वश्रुत आहे. अमानत रक्कम परत करण्यासाठी अतिरिक्त निधी मागितला. निधी आला की आम्ही ग्राहकांचा परतावा परत करणार आहोत.
- भरत सोनवणे, प्रभारी व्यवस्थापक बीएसएनएल कार्यालय 

गेल्या दोन वर्षांपासून "बीएसएनएल'च्या कार्यालयात फेऱ्या मारत आहे. दरवेळी काहीतरी नवे कारण देऊन अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते. मुंबईवरून रकमेचा चेक घरी येईल, असे सांगितले जाते. या संदर्भात तातडीने कारवाई होऊन ग्राहकांची रक्कम लवकरात लवकर परत केली जावी. 
- विठ्ठल कुलकर्णी, ग्राहक चिंचवड 
 

  • दूरध्वनी : 17 हजार 
  • ब्रॉडब्रॅन्ड : 8 हजार 
  • फायर ब्रॉडब्रॅन्ड : 4 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com