पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेचं असं केलंय नियोजन... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

अर्थसंकल्पीय विशेष सभा सोमवारी (ता. 1) दुपारी एक वाजता आयोजित केली आहे.

पिंपरी : महापालिका अर्थसंकल्पाला मान्यता, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औषधे व साहित्य खरेदी, पाणी प्रश्‍न, यंत्राद्वारे रस्ते सफाई, असे विविध विषय मंजुरीसाठी आहेत. परंतु, लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंगमुळे गेल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या सर्वसाधारण सभा झालेल्या नाहीत. त्यांच्यासह अर्थसंकल्पीय विशेष सभा सोमवारी (ता. 1) दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. यासाठी प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सची (व्हीसी) व्यवस्था केलेली असून, सोशल डिस्टन्सिंगसाठी अधिकारी पहिल्यांदाच सभागृहाबाहेर थांबणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 17 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीकडे 2020-21 या वर्षाचा पाच हजार 232 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. तो 20 मार्चच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी होता. मात्र, कोरोनामुळे सभा झालीच नाही आणि एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी आयुक्तांकडून सुरू झाली. दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी औषधे व साहित्य खरेदीचे अधिकारही स्थायी समितीने त्यांना दिले. आज तीन महिने उलटले. चौथ्या लॉकडाऊनही संपला. त्यामुळे सोमवारी (ता. 1) विशेष सभेचे नियोजन केले आहे. त्यात अर्थसंकल्पीय चर्चेबरोबरच मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या तांत्रिकदृष्ट्या तहकूब सभाही होतील. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व बैठकीत निर्णय 

सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे घेण्याबाबत काही नगरसेवकांनी सूचविले होते. त्यावर दोन दिवसांपूर्वी गटनेत्यांसमवेत बैठक झाली. त्यात प्रत्येक पक्षाचे किमान पन्नास टक्के सदस्य उपस्थित असावेत, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष व व्हीसीद्वारे सदस्यांना सहभागी होता येईल, अशी व्यवस्था करून सदस्यांना कळविले आहे. 

अशी केली व्यवस्था 

सभागृहाची आसनक्षमता 165 आहे. एका सोफ्यावर चार सदस्य बसू शकतात. मात्र, सोशल डिस्टन्सिंगमुळे सोमवारी एका सोफ्यावर केवळ दोनच सदस्यांना बसता येईल. म्हणजेच 83 सदस्य बसू शकतील. सदस्य संख्या वाढल्यास 50 खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. याद्वारे नगरसदस्यांइतकी अर्थात 133 आसनक्षमता होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अधिकारी बाहेर 

अधिकाऱ्यांसाठीच्या आसनांचा वापरही सदस्यांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी सभागृहाबाहेर असतील. केवळ एखाद्या विषयावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचेच अधिकारी व्यासपीठावर येऊन उत्तर देतील. 

असे आहेत विषय 

  • गेल्या वर्षीचे सुधारित व चालू वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पास मंजुरी देणे 
  • दुर्धर आजार ग्रस्तांना अर्थसहाय्य करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टला 25 लाख अनुदान देणे 
  • वाकड येथील भूखंड पीएमपीला बस पार्किंगकरिता तीन वर्षांसाठी देणे 
  • देहू, देहूरोड, किन्हई, चिंचोलीतील नागरिकांसाठी दोन लाख मास्क उपलब्ध करून देणे 
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य खरेदीसाठी 10 कोटी रुपये तरतूद वर्ग करणे 
  • ऐनवेळचे संभाव्य विषय : पाणीप्रश्‍न, यंत्राद्वारे रस्ते सफाई, स्वच्छता, वैद्यकीय साहित्य खरेदी 

महापालिकेची विशेष सभा सोमवारी दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होण्याबाबत 19 सदस्यांनी कळविले आहे. व्हीसीची व्यवस्था करून शनिवारी चाचणी घेतली आहे. काही सदस्य ऐनवेळी व्हीसीद्वारे सहभागी होऊ शकतील. 

- नामदेव ढाके, सभागृह नेते, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget Special Meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation