पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांनो आता सावधान!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

  • द्रुतगतीवर आता कॅमेऱ्यांची 'नजर' 
  • रस्ते विकास महामंडळाकडून किवळे ते कळंबोली दरम्यान उपाययोजना 

सोमाटणे (ता. मावळ) : तुम्ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहन घेऊन जाताना नियमांचे उल्लंघन करीत असाल, तर सावधान. कारण आता तुमच्या वाहनावर कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. वेगमर्यादा, सीटबेल्ट, लेन कटिंग किंवा कोणताही नियम तोडल्यास तुम्ही कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहात. त्यामुळे केलेल्या चुकीच्या दंडापासून तुम्हाला आता पळता येणार नाही. नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने किवळे ते कळंबोली दरम्यानच्या 94 किलोमीटरच्या रस्त्यावर दोनशे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आळा घालण्यासाठी यापूर्वी वेगवेगळ्या स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मानवी ड्रोन, वेग मोजणारी स्पीड गन, वाहन चालकांना प्रबोधन, उर्से, खंडाळा, खालापूर येथे विशेष पोलिसांच्या पथकाकडून चालकावर नजर ठेवणे, दंडाची रक्कम वाढवणे आदी उपाय करण्यात आले. मात्र, तरीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या कमी झाली नाही. द्रुतगती मार्गावर दुचाकीला बंदी असतानाही त्यांचा वावर कमी झाला नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने अखेर पूर्ण द्रुतगती मार्गावर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे तुम्ही कोणताही नियम तोडल्यास तुम्हाला दंडाला पात्र राहणार आहात. वेग मर्यादा, सीटबेल्ट, लेन कटिंग, नियमाचे उल्लंघन करणारे वाहने कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहेत. त्याची माहिती महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला तत्काळ कळणार आहे. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची कारवाईतून सुटका होणार नाही. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीही त्याच्या बॅंक खात्यातून दंडाचे पैसे वसूल करता येणार आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात पोलिसांच्या अडचणी दूर होणार आहे. शिस्त मोडणाऱ्या चालकांना त्यांनी केलेल्या चुकीचा पुरावा पोलिसांना देता येणार आहे. 
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cctv camera watch on pune mumbai expressway