डोस न घेताच मिळाले मोबाईलवर प्रमाणपत्र! Vaccine Certificate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine Certificate
डोस न घेताच मिळाले मोबाईलवर प्रमाणपत्र!

डोस न घेताच मिळाले मोबाईलवर प्रमाणपत्र!

पिंपरी - कोविशिल्डचा (Covishield) पहिला डोस (Dose) घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचे अंतर सरकारने (Government) ठरवून दिले आहे. बऱ्याच जणांनी दुसरा डोस वेळेत घेतला आहे. तर, अनेक जण दिवस उलटून गेल्यानंतर दुसरा डोस घेत आहेत. परंतु, चक्क डोस न घेताच थेट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे लशीचे प्रमाणपत्र (Certificate) मोबाईलवर मिळू लागले आहे. ‘कोविन’ ॲपवरुन संदेश गेल्यानंतर अनेकांनी हे प्रमाणपत्र ओटीपीद्वारे डाऊनलोड देखील केले आहे. परिणामी, डोस न घेताच प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिक भांबावून गेल्याचे समोर आले आहे.

एका लाभार्थ्याने पहिला डोस नऊ नोव्हेंबरला घेतला आहे. त्याने दुसरा डोस न घेताच १८ डिसेंबरला दुसरा डोस घेतल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला आहे. तसेच, २४ डिसेंबरला चार वाजून ४४ मिनिटांनी दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र कोविन ॲपद्वारे डाऊनलोड करा, असा संदेश प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे स्थळ व कोणाकडून लस टोचून घेतली हे त्या प्रमाणपत्रात नमूद केले आहे. उरवडेतील एका कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी अशा प्रकारचे संदेश आले आहेत. त्यामुळे, सर्वचजण बुचकळ्यात पडले आहेत. यातील अनेकांना विविध कामांसाठी राज्यभरात फिरावे लागते. तसेच अनेकजण पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील रहिवासी आहेत. त्यामुळे डोस न घेताच कसे फिरायचे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शिवाय, डोस घेतला नसूनही प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याच्यावरील तारखा देखील अचूक आहेत. त्यामुळे, दुसरा डोस आता मिळणार की नाही? असा संभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी लसीकरण नाही

मोबाइलवरील संदेशामध्ये ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स! यू हॅव सक्सेसफुली कंप्लिटेड द डोस शेड्यूल्ड ऑफ ऑल डोसेस ऑफ कोविड १९ व्हॅक्सिन. यू कॅन डाऊनलोड युवर सर्टिफिकेट ॲट कोविन ॲप’ असा संदेश आला आहे. तसेच, प्रमाणपत्रावर प्रमाणपत्र आयडी क्रमांक नमूद आहे. त्याचप्रमाणे, सिरम इन्स्टिट्यूट उत्पादक, वय, नाव, पत्ता, जेंडर, पहिल्या डोसची तारीख, दुसऱ्या डोसची तारीख, बॅच क्रमांक नमूद केलेला आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र या प्रमाणपत्रावर आहे.

काय आहे ‘कोविन’ ॲप

कोविनच्या वेबसाइटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरण नोंद करता येते. त्यावरुन लसीकरण केंद्र, तारीख, वेळ आदी माहिती कळविली जाते. नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाइटवर व वेबसाइट उघडल्यानंतर Register/Sign in yourself पर्यायावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर विचारला जातो. त्यावर OTP येतो. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडते. तो १८० सेकंदात टाइप करावा लागतो.

त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसते. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे भरावी लागते. यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल. केंद्र निवडल्यानंतर आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करून तपशील दिसतात. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नाव आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलीट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

लशीचे प्रमाणपत्र आणि मोबाईलवर येणारे संदेश केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. काही प्रमाणपत्र मला पाठवा. मी तशाप्रकारे संपर्क करून सरकारला कळवितो.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Certificate Received On Mobile Without Taking Dose

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top