जैववैविध्यतेतील सौंदर्य टिकविण्याचे आव्हान

शहराच्या जैववैविध्यतेत लपलेले सौंदर्य टिकविणे हे सध्या मोठे आव्हान शहरासमोर आहे. या पार्श्वभूमीवर वनस्पतीतज्ज्ञ प्रा. किशोर सस्ते यांची मुलाखत.
World Environment Day
World Environment DaySakal

पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) पूर्वी बराचसा भाग हा गायरान होता. नंतर उद्योगधंदे आणि गृहप्रकल्पांसाठी मोशी, भोसरी, चऱ्होली, डुडुळगाव, चिखली आणि तळवडेमधील सुमारे हजारो एकर जमिनी ताब्यात घेतल्या आणि कुरणांचा भाग नष्ट झाला. शहराच्या या जैववैविध्यतेत (Biodiversity) लपलेले सौंदर्य टिकविणे हे सध्या मोठे आव्हान शहरासमोर आहे. या पार्श्वभूमीवर वनस्पतीतज्ज्ञ प्रा. किशोर सस्ते यांची मुलाखत. (Challenge of Preserving the Beauty of Biodiversity)

गवताळ प्रदेशाचे काही पुरावे आढळतात?

२०१९ मध्ये एका खासगी कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार ४५३२ हेक्टर गवताळ प्रदेश या गावांमध्ये आहे. भोसरीच्या आसपासची २०९ हेक्टर क्षेत्रातील १६ गायराने सरकारी ताब्यात आहेत. पूर्वी या भागात चराऊ रान असल्यामुळे धनगर समाजाचे पशुपालक ढवळपुरी, पाटस, दौंड, पुरंदर परिसरातून मेंढ्यांचे कळप आणि वाडे घेऊन येत असतं. डांगे चौकातील दैवत धनगरबाबा, हनुमान टेकडीची बानाई देवी आणि भोसरीतील कलावंतीन देवी या पशुपालकांची दैवते होती. ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅझेटमध्ये उल्लेख असलेली भोसरीमधील गायरान परिसरातील धनगर पशुपालक समाजाची असलेली जुनी महापाषाणीय संस्कृतीची वर्तुळशिल्पे मोशी येथील गवताचा गंजीखाना हे गवताळ प्रदेशाचे पुरावे आहेत.

World Environment Day
माचिस न दिल्याच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

पागाची जागा, पागाचा वाडा म्हणजे?

गवत मुबलक आहे म्हणून ब्रिटिश मिलिटरीने पिंपरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळात दूध डेअरी उभारली होती. स्थानिक शेतकऱ्यांचे गोठे मोठे होते. काही जनावरे या गायरानामध्ये हलवल्याचा उल्लेख ‘पिंपरी-चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकात आहे. दुग्ध व्यवसाय आणि पशुधन असल्याने सध्या या परिसरास ‘गवळी माथा’ या नावाने ओळखले जात आहे. घोड्यांच्या पायाच्या खुराला बुरशीचा संसर्ग होऊ नये म्हणून चरण्यासाठी पेशवेकालीन सैन्याचे घोडे मोशी भागातील कुरणांमध्ये येत. त्यास ‘पागाची जागा’ किंवा ‘पागाचा वाडा’ म्हणतात, असे‌ जुने लोक सांगत आहेत.

सध्या कोणत्या वनस्पती आहेत?

मारवेल, गोंडळ आणि गाठी गवत शहरात आहे. गवताळ कुरणांमध्ये येथे ‘लोफोपोगोन’ हे गवत पिकांसाठी चांगल्या असणाऱ्या जमिनीचे दर्शक आहे. काळा बोंगडा किंवा काळी कुसळ, पाणथळ जागेवर असणारे फुलोरा, भातांडी आणि गवती चहासारखे वास येणारे रोशा या गवतांबरोबरच खैर, भुत्या, मेडशिंगी, वाघाटी, बोर, रानमेवा खरमाडी, घाटबोर या गवतांबरोबर सपाट ठिकाणी किंवा डोंगराच्या गवताळ उतारावर असणारी झाडे-झुडुपे आढळून आले आहेत. तसेच खडकशेपू, शंखपुष्पी, गाय बैल आजारी पडल्यावर वापरला जाणारा किर कांदा, साप कांदा आणि गवती‌ तिळवण या शाकीय वनस्पती देखील आहेत. या वनस्पतींबरोबरच खाद्य म्हणून वापरली जाणारी ‘हमान’ वेल म्हणजे ‘सिरोपेजीया’, रानभाज्यांमध्ये भारंगी, कर्टुली, हिरणदोडी, कांदापातसारखी कुळई, शिंदड, माकुडी आणि कुडा या भागात भरपूर होत्या व अजूनही आहेत.

World Environment Day
अनधिकृत होर्डिंगना बसला चाप! लॉकडाउनचा परिणाम

आता जतन कशाप्रकारे करता येईल?

सध्या बांधकामासाठी फोडल्या जाणाऱ्या डोंगर टेकड्या, खाणकाम, औद्योगीकरण, कचरा डेपोमुळे वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.‌ काही भागातून या वनस्पती नामशेष झाल्या आहेत. माळरानावर २५० एकरावर सफारी पार्क करण्यात येणार आहे. जैवविविधतेचे संरक्षण व्हावे म्हणून स्थानिक वनस्पती, देशी वृक्षांची लागवड व गवताळ कुरणांचे संरक्षण करून माहिती केंद्र व बॉटनिकल गार्डन तयार केले पाहिजे. तळवडेच्या‌ ९० एकर भागात हरिण सफारी पार्क तयार‌ होत आहे. या ठिकाणी मत्स्यालय, बोटिंग क्लब, आणि ट्रेकिंग पार्कबरोबरच हरणांचे खाद्य असणाऱ्या ‌शहराच्या पूर्वेकडील गवताळ कुरणांच्या भागाचा देखील विचार व्हावा. दापोडी, सांगवी, बोपखेल, भोसरी आणि चऱ्होलीतील जमिनी संरक्षण विभागाने संरक्षित केल्या आहेत. जैवविविधतेकडे व्यावसायिकरित्या न पाहता नव्याने संशोधन करायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com