
Chandrakant Patil : पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी; संभाजी ब्रिगेड व सामाजिक संघटनांची मागणी
पिंपरी : पालकमंत्र्यांवर झालेल्या शाई फेक प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांना नाहक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. शहर पोलिसांकडून नेहमीच सर्वसामान्य जनतेसह नेते मंडळींच्या सुरक्षा उत्कृष्टरित्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या कामाच्या निष्ठेची पोचपावती दिल्यास ते आणखी चांगली कामगिरी करू शकतील. त्यामुळे पोलिसांचे केलेले निलंबन मागे घ्यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे व शहरातील विविध पक्ष, संघटनांनी केले आहे.
काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. ही जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांसह सुरक्षा व्यवस्थेत उतम कामगिरी बजावत आहेत. शहरात पोलीस संख्या कमी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा बोजा त्यांना सहन करावा लागत आहे. कामाचा ताण येत आहे. त्याचा परिम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामध्येच शहरात पालकमंत्र्यांच्या अंगावर शाई फेकण्याची घटना घडली. यामध्ये पोलिसांचे केलेले निलंबन त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. हे निलंबन तातडीने मेगे घेऊन त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन काळे यांनी केले.
दरम्यान; शिवसेनेचे पिंपरी विभाग प्रमुख दिपक कांबळे यांनी शाईफेक प्रकरणी पोलीसांवरील निलंबनाची केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले असून गृह विभागाच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई मागे घेऱ्यासंदर्भात पोलीसांनी अहवाल मागविला आहे.