esakal | बनवेगिरी करून निवासी इमारतींचा वापर होतोय ‘कोविड’ रुग्णांसाठी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

बनवेगिरी करून निवासी इमारतींचा वापर होतोय ‘कोविड’ रुग्णांसाठी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोविड केअर सेंटरच्या आडून समाजसेवेच्या नावाखाली अर्थकारण साधले जात आहे. निवासी इमारतींचा वापर ‘कोविड’ रुग्णांसाठी केला जात आहे. शाळा, कॉलेज सुरू असताना कॉट बेसिसवर दिले जाणारे फ्लॅट आता कोविड केअर सेंटर चालकांना भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. विशेष म्हणजे पालिकेकडे नोंद केलेला कोविड सेंटरचा पत्ता व प्रत्यक्ष सेंटर सुरू असलेले ठिकाण वेगळे आहे. याबाबत काही स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतले. असून, बनवेगिरी करून सुरू केलेल्या सेंटरबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.

महापालिकेने खासगी संस्थांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे १०१ सेंटर शहर परिसरात सुरू आहेत. मात्र, काही संस्था व रुग्णालयांनी वेगवेगळ्या ठिकाणी इमारती भाडेतत्त्वावर घेऊन कोविड सेंटर सुरू केले आहेत. महापालिकेकडे नोंद केलेला पत्ता व प्रत्यक्ष सेंटर सुरू केलेले ठिकाण वेगवेगळे आहे. विशेषतः असे सेंटर हे निवासी इमारतींमध्येही सुरू केलेले आहेत. याबाबत रावेत प्राधिकरण सेक्टर २९ मधील कविता कोंडे-देशमुख म्हणाल्या की, आमच्या भागामध्ये एक क्वारंटाइन सेंटर एका रुग्णालयाने सुरू केले आहे. आणखी एक सेंटर सुरू करण्याची तयारी आहे. हा भाग निवासी वापराचा आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. कोरोना बचाव करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. मात्र, काही लोक पैसे कमविण्याच्या उद्देशाने निवासी इमारतींचा कोविड सेंटरसाठी विनापरवाना वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रवृत्तींना आमचा विरोध आहे. याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितल्याचे देशमुख म्हणाल्या. त्यांच्यासह सुमारे दीडशे नागरिकांनी अशा सेंटरला विरोध दर्शविला आहे. याबाबत निवेदनही त्यांनी दिले. नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्याकडेही नागरिकांनी निवेदन दिले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत ७६१३ बेड

दरम्यान, रावेत सेक्टर २९ मधील कोविड सेंटर महापालिकेच्या यादीत नाही. मात्र, संबंधित सेंटरला ज्या रुग्णालयाचे नाव दिलेले आहे, ते रुग्णालय नेहरूनगर येथील आहे. याबाबत पालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांच्याशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने मोबाईलद्वारे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

असे आहे गणित

कॉलेज सुरू असताना कॉटबेसिसवर किंवा भाडेतत्त्वाने फ्लॅट दिले जात होते. वर्षाला ५० ते ६० हजार रुपये भाडे मिळायचे. मात्र, आता विद्यार्थी नाहीत. त्यामुळे फ्लॅट रिकामे आहेत. कोरोना रुग्णांना वा रुग्णालयांना ते दिल्यास महिन्याला ५०-६० हजार रुपये भाडे मिळत आहे.

मेडिकल वेस्टचे काय?

कोविड केअर सेंटरमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार? तेथील रुग्ण खिडकी किंवा गॅलरीतून कचरा खाली फेकतात. त्याचा इतरांना धोका आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे.

रावेत प्राधिकरण सेक्टर २९ मधील व शहरातील अन्य कोणत्याही विनापरवाना कोविड केअर सेंटरबाबत आमच्‍याकडे तक्रार आलेली नाही, असे डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. असे सेंटर कुठे सुरू असतील तर, नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी. त्यावर कारवाई केली जाईल.

- शिरीष पोरेडी, प्रवक्ता, महापालिका