
Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये १४ फुट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण
- बेलाजी पात्रे
हिंजवडी - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेकदिन सोहळा परदेशातही मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्रापासून सुमारे पाच हजार किलो मीटर दूर सातासमुद्रापार व हिंद महासागराचा तारा मानला जाणाऱ्या मॉरिशस देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. हजारो मराठी बांधवांनी हा अविस्मरणीय क्षण याची देही याची डोळा अनुभवला.
आयटी पार्क हिंजवडी परिसरातील उद्योगपती व मारुंजी गावचे सुपुत्र विठ्ठल चव्हाण यांनी १४ फुट उंचीचा महाराजांचा अश्वारुढ पुतळा मॉरिशसला दान केला असून ब्रिटिशांनी मॉरिशस बेटाच्या ज्या ब्लॅक रिव्हर परिसरात मराठ्यांना फ्रेंचांच्या ताब्यात दिले होते त्याच गणेश मंदिर परिसरात राजांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. मॉरिशसचे उपराष्ट्रपती मारी शिरील एडीबॉयसेजन यांच्या हस्ते या अश्वारुढ पुतळ्याचे राज्याभिषेक दिनाला अनावरण झाले.
कोकणातील मराठी बांधव १८३४ ते १८४१ या काळात स्थलांतरित होऊन काळ्या नदीच्या परिसरात स्थायिक झाले होते. म्हणून या ब्लॅक रिवहर गावाची निवड करण्यात आली.

मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली मॉरिशस मराठी मंडळ सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पुतलाजी व पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तनकार शिवभूषण. ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला बडोद्यातील उज्ज्वलसिंह राजे गायकवाड सरकार, सांगलीतील शाहीर प्रसाद विभुते व उपस्थित अन्य वीस खास पाहुण्यांनी मॉरिशसमधील या अनोख्या सोहळ्यात महाराष्ट्र देशाची महती विविध कला-गुणांच्या माध्यमातून सांगितली.
येत्या काळात जगभरातील पर्यटक, नागरिकांना विमानातून व मॉरिशस विमानतळावर पाऊल ठेवताच महाराजांचे दर्शन घडावे यासाठी सर्वप्रथम आंतराष्ट्रीय विमानतळावर आणि त्यानंतर संपूर्ण मॉरिशस शिवमय व्हावा म्हणून अन्य चार महत्वाच्या ठीकाणी उद्योगपती विठ्ठल चव्हाण यांच्या योगदानातून महाराजांचे भव्यदिव्य पुतळे उभारले जाणार आहेत त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या योगदानासाठी चव्हाण यांचा विशेष सन्मान झाला. माझ्या राजांच्या व मायभूमीच्या गौरवासाठी वाटते वाट्टेल ते करण्याची तयारी असल्याचे सकाळशी बोलताना त्यांनी सांगितले.
शिवराज्यभिषेक सोहळ्यात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा सुमारे शंभर कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरणीकरण झाले. जय जय महाराष्ट्र माझा, स्वतंत्र ते भगवती, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा!, मंगल देशा पवित्र देशा, यांसारख्या अनेक अजरामर गीते व पोवड्यांतून राजांची अन महाराष्ट्राची गोडवी त्यांनी गायली. रोहिदास महाराज हांडे यांनी स्वरचित पोवाडा गायला. ते म्हणाले, माझ्या २४ वर्षांच्या अध्यात्मिक तप:श्चर्येत ही १९ वी खेप होती. मॉरिशस शिवमय करण्याचे आम्हा सर्वांचे स्वप्न असून ते उद्योगपती विठ्ठल चव्हाण यांच्या मोठ्या योगदान व दातृत्वात सत्यात उतरत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.