Arangetram Dance : अरंगेत्रम्’ नृत्याविष्काराने वाकडच्या बाल नृत्यांगणांनी जिंकली उपस्थितांची मने

भरत नाट्यम् या नृत्य शैलीतील ‘अरंगेत्रम्’ हा एक अवर्णनिय कार्यक्रम सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पार पडला
child dancers of wakad won hearts of audience with her arangetram dance performance
child dancers of wakad won hearts of audience with her arangetram dance performanceSakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड : भरत नाट्यम् या नृत्य शैलीतील ‘अरंगेत्रम्’ हा एक अवर्णनिय कार्यक्रम सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पार पडला. वाकड येथील ब्लॉसम नृत्य अकादमीच्या संचालिका मौसम मेहता यांच्या शिष्या चिन्मयी देशमुख, शर्वरी मुळूक आणि अवनी कुलकर्णी या बारा-तेरा वर्षांच्या कोवळ्या मुलींनी अथक तीन तास केलेल्या सादरिकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींचे पहिले पाऊलच एवढे आत्मविश्वासपूर्वक होते की, त्या नवख्या आहेत असे कोणासही जाणवले नाही. त्यांनी प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले. ‘पुष्पांजली’ या नृत्य प्रकारातून आद्य शंकराचार्य रचित शिव-वंदना व रंगमंचावरील सर्व निष्णात वादकांना व प्रेक्षकांना वंदन करून सुरुवात झाली.

मग मृदुंग, घटम्, व्हायोलिन, बासूरी, टाळ यांचा सुंदर मिलाफ आणि शिव प्रसाद यांच्या रागदारी युक्त मंजुळ गायनाचा नेमका धागा पकडून या तीघींनी अशी काही बहार आणली की, त्यांच्या कलाकृतीचा आलेख वरचेवर चढत राहिला.

वादक आणि गायक यांच्या तालावर होणारा नेमका पदन्यास, भृकुटी विभ्रम, नयन विलोभन, हस्त व कराग्र लाघव, जोडीला प्रत्येक नृत्य प्रकारास शोभेल अशी भर्जरी वेशभूषा, सुंदर मेकअप आणि प्रभावी प्रकाश-ध्वनि योजना या कार्यक्रमाच्या जमेच्या बाजू होत्या. या तीनही कलाकारांनी परस्परातील समन्वय व सजगता यांचे ध्यान राखून अप्रतिम प्रदर्शन केले.

प्रसिद्ध नृत्यांगना व उद्घाटक शमा भाटे यांनी या मुलींच्या मेहनतीचे आणि त्यांच्या गुरु मौसम मेहता यांचे कौतुक केले. मोक्ष नृत्य शाळेच्या अंजली बागल यांनी “मौसम यांच्यासारख्या मेहनती, कुशाग्र बुद्धी शिष्येने तिच्या सारखेच गुणी व सुबुद्ध कलाविशारद शिष्य निर्माण करावेत असे उद्गार आशीर्वाद देताना काढले.

अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाजपटू अंजली भागवत यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्व विषद केेले. ब्लु रिज स्कुलच्या प्राचार्या सूरिंदर सायान, यांनी या मुलींचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले. माजी नगरसेविका आरती चोंधे आवर्जून उपस्थित होत्या.

प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कलाकार कन्या पालकांच्या वतीने चिन्मयीचे वडील व वाकड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अनय देशमुख यांनी आभार मानले. पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रवक्ते अरुण देशुमुख यांची चिन्मयी नात आहे.

अरंगेत्रम्’ म्हणजे काय ?

नृत्य प्रकारात ‘अरंगेत्रम्’ म्हणजे अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी समर्पित वृत्तीने रंग-मंचावर पहिले पाऊल टाकणे. त्यांनी सादर केलेल्या जाती स्वरम् (राग: कल्याणी, ताल : रुपक), शिव प्रार्थना (राग: रेवती, ताल: आदी), दशावतार (राग आणि ताल : रेवती) या कलाकृती खूपच प्रत्ययकारी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com