Chinchwad News: शरद पवार यांनी दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा ; चंद्रशेखर बावनकुळे Chinchwad Assembly constituency Sharad Pawar Chandrasekhar Bawankule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Chandrasekhar Bawankule on Pune By Election

Pune By Election 2023 : शरद पवार यांनी दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा ; चंद्रशेखर बावनकुळे

Chinchwad News : चिंचवड व कसबा या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ( ता. ६) थेरगाव येथे पत्रकारांशी बोलताना केले.

भाचपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होणार्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आदि उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः महाविकास आघाडीचा नेत्यांशी बोललो आहे. मी आणखी त्यांना भेटायला व बोलायला तयार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी पुढाकार घेवून निवडणूक बिनविरोध केली, त्याचप्रमाणे चिंचवड व कसबा या दोन्ही पोटनिवडणुकाही बिनविरोध कराव्यात, अशी आमची विनंती आहे. अर्ज व प्रचार हा “प्रोटोकॉल”नुसार करावाच लागणार.

शंकर जगताप यांचा डमी अर्ज

हा अर्ज भरण्यासाठी मोठी रॅली व प्रचंड जनसमुदाय होता. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्ज भरला असून बाळासाहेबांची शिवसेना व मु्ख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

शंकर जगताप यांचा डमी अर्ज आहे. आम्ही उमेदवार बदलणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

शंकर जगताप यांनीही आपला डमी अर्ज असल्याचे स्पष्ट केले. अश्विनी जगताप यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेमापोटी अर्ज भरताना पदयात्रेत जनसमुदाय आल्याचे सांगितले.