पिंपरी : आतापर्यंत एवढे परप्रांतीय परतले आपल्या गावी...

आशा साळवी
Saturday, 9 May 2020

शहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी : शहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या निवारा केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून राहत असलेल्या 385 पैकी 31 मजूरांना प्रशासनाच्या परवानगीनंतर वेगवेगळ्या बसद्वारे शनिवारी (ता. 9) पाठविण्यात आले. हे मजूर तेलंगण, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशाकडे रवाना झाले आहेत. अजूनही 354 जण परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात तेलंगण, मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश अशा परप्रांतीयासह नाशिक, अमरावती, कोल्हापूर, जळगाव सोलापूर, असे परजिल्ह्यातील मजूर कामानिमित्त आले होते. लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून अनेक मजूर या परिसरातच अडकून पडले आहेत. संचारबंदीत मालकाने हात वर केल्याने त्यांची उपासमार होत होती. या मजूरांची आतापर्यंत स्थानिक प्रशासनामार्फत तीन वेळेचे भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या या मजूरांना आता घरची ओढ लागलेली आहे. 'आम्हालादेखील घरी जाऊ द्यावे', अशी त्यांची प्रशासनाकडे सारखी मागणी सुरू होती. त्यातच केंद्र सरकारने परराज्यात जाणाऱ्यांसाठी काही नियम घालून दिल्याने परप्रांतीयांचा आपल्या गावाकडे परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

354 जण प्रतीक्षेत

महापालिकेच्या निवारा केंद्रात सध्या परराज्यातील 264 जण आहेत. त्यात सर्वाधिक मध्य प्रदेशचे 128, उत्तर प्रदेश 53, कर्नाटक 49, तेलंगण 15 अशी संख्या; तर परजिल्ह्यातील 121 जण राहताहेत. त्यापैकी जळगावचे 39, अमरावतीचे 12, सोलापूरचे 12, पुणे जिल्ह्यातील 18, नाशिकचे 134 जणांचा समावेश आहे. परजिल्ह्यातील नागरिकांनी स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करूनदेखील जाण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, उर्वरित प्रतीक्षेतील परप्रांतीयांच्या नावाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. रेल्वेची सुविधा झाल्यावर त्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

निवारा केंद्र : स्थलांतरित परराज्य व परजिल्हा बेघरांची संख्या

  • आकुर्डी उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, खंडोबामाळ : 104
  • केशवनगर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, चिंचवडगाव : 67
  • नेहरू संकुल, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नेहरूनगर : 9
  • अण्णासाहेब मगर प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, पिंपळे सौदागर : 55
  • छत्रपती विद्यालय, प्राथमिक- माध्यमिक भोसरी संकुल : 52
  • कै. मधुकरराव पवळे प्राथमिक व माध्यमिक शाळा, सेक्‍टर 22, निगडी  : 16
  • थेरगाव संकुल प्राथमिक- माध्यमिक विद्यालय : 0
  • कमला नेहरू प्राथमिक शाळा पिंपरीगाव : 62
  • रात्र निवारा केंद्र - भाजी मंडई जवळ, पिंपरी : 20

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are returning from the city to their respective states