पाणीपुरवठा, वैद्यकीयची दर आठवड्याला बैठक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

स्थायी समिती सभेव्यतिरिक्त अन्य दिवशी दर आठवड्याला तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठकी घेण्याचे नियोजन आहे. त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून होणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले. 

पिंपरी - शहरातील नागरिकांचे पाणीपुरवठा, विद्युत व वैद्यकीय विभागांसंदर्भात प्रश्‍न आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढील आठवड्यापासून तिन्ही विभागांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी दिली. 

गेल्या वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवले जाईल, इतकी यंत्रणा सध्या महापालिकेकडे नाही. त्यामुळे दिवसाआड पाण्याबरोबरच काही भागांमधील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. विद्युत व वैद्यकीय विभागाबाबतही हीच स्थिती आहे. त्यावर स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत वेळोवेळी चर्चा होते. मात्र, अन्य विषय असल्याने पाणीपुरवठा, विद्युत व वैद्यकीय विभागांच्या प्रश्‍नांवर चर्चा करायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्वच प्रश्‍न सुटू शकत नाहीत. त्यावर उपाय म्हणून स्थायी समिती सभेव्यतिरिक्त अन्य दिवशी दर आठवड्याला तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठकी घेण्याचे नियोजन आहे. त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून होणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेत 20 वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या चिखली, चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, तळवडे आदी गावांसाठी भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून येत्या जूनपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल आणि त्यानंतर शहरी अर्थात अन्य भागात नियमितपणे दररोज पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असेही लोंढे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens issue regarding water supply electricity and medical departments

Tags
टॉपिकस
Topic Tags: