'त्या' रडतच म्हणाल्या, आठ वाजल्यापासून मुलगी अन् मी इथं आहोत...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

पोलिस आणि वल्लभनगर एसटी स्थानकातील ताळमेळाअभावी कर्नाटकातील श्रमिक कुटूंबांना तब्बल नऊ तासांहून अधिक काळ एसटीची वाट पाहण्याची पाळी आली. त्यांना एसटी अधिकाऱ्यांनी स्थानकामधून बाहेर हुसकावून लावण्याचेही प्रयत्न केल्याचा आरोप काही लोकांना यावेळी केला.

पिंपरी ः पोलिस आणि वल्लभनगर एसटी स्थानकातील ताळमेळाअभावी कर्नाटकातील श्रमिक कुटूंबांना तब्बल नऊ तासांहून अधिक काळ एसटीची वाट पाहण्याची पाळी आली. त्यांना एसटी अधिकाऱ्यांनी स्थानकामधून बाहेर हुसकावून लावण्याचेही प्रयत्न केल्याचा आरोप काही लोकांना यावेळी केला. एसटी उपलब्ध न झाली नसल्याने या कुटूंबांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या मदतीने वल्लभनगर एसटी प्रशासनाकडून परप्रांतीय लोकांना त्यांच्या मूळगावी पाठविले जात आहे. मात्र, एसटी प्रशासन आणि पोलीसांत ताळमेळ नसल्याचेही उघडकीस येत आहे. त्यामुळे, श्रमिक कुटूंबांना एसटी गाड्यांसाठी कित्येक तास ताटकळत थांबावे लागण्याचे प्रकारही घडत आहेत. 

मोरे वस्ती येथे राहत असलेले आणि मूळचे विजापूर येथील भोगप्पा मादर म्हणाले,""मी एका खासगी कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो. कंपनीकडून केवळ अर्धाच पगार मिळत असल्याने टाळेबंदी उठेपर्यंत गावी राहण्याचे ठरविले आहे. त्यासाठी माझ्या कुटूंबासह सकाळी दहा वाजता वल्लभनगर एसटी स्थानकावर आलो. मात्र, दुपारी साडेचार वाजेपर्यंत आम्हाला एसटी मिळालेली नाही. सकाळच्यावेळेस गुलबर्गा, बिदर येथील 15 लोक होते. ते देखील गाडीची वाट पाहून निघून गेले. चिखली पोलीस म्हणतात आम्ही एसटी स्थानकावर यादी पाठविली आहे. परंतु, तुम्ही पोलीसांना प्रत्यक्ष बोलवा. तुमची प्रवासी संख्या कमी आहेत. त्यामुळे, गाडी सोडता येणार नाही, अशी कारणे देत आहेत.'' 

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

त्रिवेणीनगर येथील अनिता लंगोटे रडतच म्हणाल्या,""मला कर्नाटकातील शहाबाद येथे जायचे आहे. अक्कलकोटपर्यंत तुम्हाला सोडले जाईल, असे आम्हाला सांगितले गेले. चिखली पोलीसांनी फोन करुन एसटी स्थानकावर जाण्यास सांगितले. त्यानुसार, सकाळी 8 वाजल्यापासून मी आणि माझी मुलगी गाडीची वाट पहात आहोत. मात्र, अजूनही आम्हाला गाडी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. आता एसटीचे अधिकारी आम्हाला इथे बसू नका.. तिथे बसू नका, बाहेर जा अशा सुनावत आहेत.'' 

खासगी गाडी करुन जाणार ! 
""आमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असतानाही एसटी गाडी उपलब्ध करुन देण्यात आली नाही. वेगवेगळी कारणे देऊन आम्हाला थांबविण्यात आले आहे. मात्र, आम्हाला गाडी मिळाली नाही तर भाड्याने खासगी वाहन करुन गावी जाऊ'', असेही लंगोटे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत, आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही एसटी आगाराला 40 लोकांची यादी दिली आहे. त्यातील काही लोक कोल्हापूर तर काही लोक सोलापूर मार्गावरचे आहेत. त्यामुळे, कदाचित, एसटीगाड्या सोडल्या नसाव्यात. मात्र, एसटी प्रशासनाने सर्व प्रवाशांना हजर करायचे सांगितले. तर आम्ही त्यांना हजर करु - सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens suffer due to lack of coordination between police and ST administration