esakal | Pimpri : महापालिकेच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीची सक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

50 टक्के उपस्थितीची अट रद्द करा; शिक्षकांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Pimpri : महापालिकेच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीची सक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोविडची तीव्रता कमी झाल्याने प्रशासकीय कामकाज व ऑनलाइन शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. परिणामी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शालेय कामी उपस्थित राहून कामकाज सुरू करायचे आहे. तसेच त्यांनी दरमहा पगारबिलासोबत बायोमेट्रीक अहवाल सादर करण्याची सक्ती शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत यांनी केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे परीक्षाही रद्द झाल्या. सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून, सर्व शिक्षकांनी कोरोनाविषयक बाबींची खबरदारी घेऊन शाळेत ५० टक्के उपस्थिती लावली. या आदेशामुळे काही शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान आता कोरोनोचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ७ सप्टेंबरला बैठक घेतली. त्यात तोंडी सूचना दिल्या आहेत. त्या सुचनांच्या महापालिका क्षेत्रातील सर्व महापालिका प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना परिपत्रकात निर्देशित करण्यात आले आहे.

प्राथमिक शाळेत १३०० शिक्षक संख्या आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय कामी उपस्थित राहून कामकाज सुरू करायचे आहे. कोणताही संभ्रम न ठेवता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत शिक्षकांनी शाळेत १०० टक्के उपस्थित राहावे, असे आवाहन उपआयुक्त खोत यांनी केले आहे.

बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

दरम्यान, नियंत्रणातील शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती करून त्यांना बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे सक्तीचे केले आहे. १०० टक्के उपस्थित राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करण्याच्या सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच संबंधित मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावर कोरोनोचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊन शालेय कामकाजाचे नियोजन करायचे आहे. दरमहा पगारबिलासोबत बायोमेट्रीक अहवाल जोडणे सक्तीचे केले आहे.

loading image
go to top