दापोडीकर म्हणतायेत, 'जरा इकडंही लक्ष द्या'; काय आहे प्रकरण...वाचा

रमेश मोरे
सोमवार, 29 जून 2020

लॉकडाउन शिथिल होऊन महिना उलटला, तरी कोरोनाच्या नावाखाली परिसर स्वच्छतेच्या कामाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दापोडीत चित्र आहे.

जुनी सांगवी (पुणे)  : दुष्काळात तेरावा महिना म्हणावा, अशीच स्थिती सध्या दापोडीकरांची झाली आहे. दाट लोकवस्ती, अरूंद गल्लीबोळ, झोपडपट्टी बहूल वस्त्या असलेल्या दापोडीकरांवरील कोरोना संसर्ग वाढत असताना त्यात भर पडत आहे, ती इथल्या उघड्या तुंबलेल्या गटारांमधील घाण व कचऱ्यामुळे येथील नागरी आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लॉकडाउन शिथिल होऊन महिना उलटला, तरी कोरोनाच्या नावाखाली परिसर स्वच्छतेच्या कामाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दापोडीत चित्र आहे. तर  पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे  उघडी असल्याने त्यात कचरा, अन्नपदार्थ, राडारोडा, वाहून आलेल्या मातीमुळे डास-किटकांचा प्रादुर्भाव या भागात वाढला आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या नावाखाली प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरी समस्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सोयी सुविधा होत नसल्याने येथील नागरिकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील अकरा नं. बसथांबा रस्ता, गणेश गार्डन, पिंपळेगुरव रस्ता येथे पावसाळी पाण्याची गटारे घाण कचऱ्याने तुंबली आहेत. येथेच भूमीगत विद्यूत पुरवठा करणाऱ्या केबल व डी.पी. बॉक्स आहे. नागरिकांनी याची कचराकुंडी केली आहे. अनेकदा तक्रारी करूनही येथील स्वच्छता होत नाही, असे नागरीक सांगतात. स्थापत्य विभागाने ही गटारे झाकण लावून बंदीस्त करून घेतल्यास त्यात कचरा जाणार नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. तसेच, स्थापत्य विभाग टोलवाटोलवी करत असून, आम्ही यापूर्वी अनेकदा येथील स्वच्छता केली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. स्थापत्य व आरोग्य विभागात समन्वय नसल्याने नागरिकांना मात्र, या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या सहा महिन्यांपासून येथील परिस्थिती 'जैसे थे' आहे. अधिकारी केवळ टोलवाटोलवी करतात. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतर आजाराची भीती निर्माण झाली आहे.
- गणेश काटे, नागरिक 

परिसरात थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहेत. परिसराची स्वच्छता नसल्याने नागरिकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना संकट काळात सर्व यंत्रणा राबत असली, तरी इकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
- राम सिंग, नागरिक 

येथे पावसाळी गटार उघडे असल्याने वाहून आलेला कचरा, नागरिकांनी टाकलेला उघड्यावरील कचरा, यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थापत्य विभागाने हे गटार बंदिस्त केल्यास अडचण येणार नाही.
- सुनिल चौहान, आरोग्य निरिक्षक, दापोडी विभाग 

स्थापत्य व आरोग्य विभागाने समन्वयाने काम करून घेण्याबाबत दोन्ही विभागाकडे मागणी केली आहे.
- स्वाती काटे, नगरसेविका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Condition of sewers in Dapodi