जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पासाठी निविदा प्रकिया राबवा; आमदार बनसोडे यांची मागणी 

टीम ई-सकाळ
Monday, 22 June 2020

जैव वैद्यकीय कचरा अर्थात बायो मेडिकल वेस्ट नष्ट करण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे प्रकल्प उभारणे, त्याचे संचालन 15 वर्षे करणे, हे काम पास्को या ठेकेदार कंपनीस देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका स्थायी समिती सभेने मंजूर केलेला आहे.

पिंपरी : जैव वैद्यकीय कचरा अर्थात बायो मेडिकल वेस्ट नष्ट करण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे प्रकल्प उभारणे, त्याचे संचालन 15 वर्षे करणे, हे काम पास्को या ठेकेदार कंपनीस देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका स्थायी समिती सभेने मंजूर केलेला आहे. तो सर्वसाधारण महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र, हा प्रस्ताव रद्द करून नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालये व दवाखान्यांमध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा गोळा करताना मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीचा व शब्दरचनेचा फायदा घेऊन प्रशासन ठेकेदारावर उदार होऊन कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता 15 वर्षे एवढ्या दीर्घ कालावधीसाठी पास्को या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी टेंडर काढण्याची मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्तांनी खुलासा द्यावा... 

जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्लान्ट मोशी येथे स्थलांतर करून 15 वर्षे एवढ्या दीर्घ मुदतीने संचालनासाठी त्याच ठेकेदार कंपनीस देण्याचा उद्देश काय? पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता करारनाम्यातील अटी-शर्ती व शब्दरचनेचा फायदा घेऊन प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी व महासभेत समोर ठेवण्याचा हेतू काय? निविदा प्रक्रिया न राबविल्याने महापालिकेचा काय व किती फायदा होणार आहे, हे प्रसिद्धी पत्रकाद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे शहरातील नागरिकांना अवगत करावे? असा खुलासा आमदार बनसोडे यांनी आयुक्तांकडे मागितला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा या प्रकरणी दबाव असल्याची चर्चा प्रशासकीय यंत्रणेत आहे. प्रशासनाने अशा प्रकारे शासनास अंधारात ठेऊन स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबविता ठेकेदारास काम देणे योग्य नाही. करारनाम्यातील अटी व शर्तीचा फायदा घेऊन भ्रष्टाचार सुरू आहे. असा प्रकार थांबला पाहिजे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही बनसोडे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conduct tender process for biomedical waste project at moshi